यवतमाळ: उमरखेड शहरातील एका ऑटोमोबाईल्स दुकानाला तीन अज्ञातांनी आग लावून दुकानातील माल जाळून टाकला होता. ही घटना शहरातील नांदेड रोडवरील दुकानात २७ एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारस घडली होती. यातील तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. इंस्टाग्रामच्या आधारे लोकेशन काढून पोलीस पथकाने नांदेड येथील त्याच्या मावशीच्या घरातून त्याला जेरबंद केले.
नांदेड रस्त्यावरील सुनील भराडे यांच्या मालकीच्या ऑटोमोबाईल्स दुकानाला आग लावण्यात आली होती. या घटनेची तक्रार गणेश सुनील भराडे यांनी दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तीन अज्ञात युवकांनी आग लावल्याचे पुढे आले. या तिघांपैकी दोघांना उमरखेड पोलिसांनी लगेच एका दिवसातच अटक केली होती .त्यामध्ये अल्ताफ कुरेशी, शेख तहेमिर शेख समीर (ताजपुरा वार्ड, उमरखेड) यांना अटक केल्यानंतर मुख्य आरोपी अजहर उर्फ अजहर शुट शेख अकबर हा घटना घडल्या त्या दिवसापासून पसार होता. या आरोपीचा मागील तीन महिन्यापासून सायबर सेल, यवतमाळ शोध घेत होते. त्याच्या मोबाईल वरुन त्याचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला असता. तो बंद होता.
मात्र इंस्टाग्राम चालवत असल्याने त्याच्या आयडीवरून लोकेशन काढण्यात आले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल संजय टेंबरे, होमगार्ड चांदीवाले यांनी नांदेड येथे जाऊन त्याच्या मावशीच्या घरी लपून असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. शनिवारी त्याला तब्येत घेऊन उमरखेड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे करीत आहेत. सदर आरोपी विरोधात यापूर्वी उमरखेड ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाल्याचे निष्पन्न झाले असून सदर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे .