लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात जीवन प्राधिकरणच्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे विविध आजारांची लागण झाली आहे. वापरण्यायोग्यही पाणी जीवन प्राधिकरण देत नाही. दूषित पाणीपुरवठा तत्काळ थांबवून नियमित शुद्ध पाणी द्यावे, या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशीही जीवन प्राधिकरण कार्यालयावर संतप्त नागरिकांचा मोर्चा धडकला.शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. उन्हाळ्यातील दुष्काळी स्थितीत जीवन प्राधिकरणची यंत्रणा कुठेच दिसली नाही. भरपूर पावसानंतर पाणीपुरवठ्याचे प्रकल्प तुडुंब भरल्यानंतर तीन दिवसाआड नियमित पाणीपुरवठा होईल, असा विश्वास प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र स्थिती अजूनही सुधारलेली नाही. शहरातील बहुतांश भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे पाणी उपलब्ध असूनही टंचाईची समस्या भेडसावत आहे. दूषित पाणी पिण्यात आल्याने आजार वाढले आहे. इतकेच नव्हे तर शहरातील पाणी वितरणाची पाईप लाईन ठिकठिकाणी लिकेजेस असल्यामुळे मोठा अपव्यय होत आहे. पाईप लाईन घाणीच्या जागेत लिकेज असल्याने नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. जीवन प्राधिकरणाच्या शुद्धीकरण केंद्रात पाण्यावर कुठलीच प्रक्रिया होत नसल्याचे दिसून येते. प्रकल्पातून पंपिंगद्वारे ओढलेले पाणी थेट नळातून वितरित केले जात आहे. या दूषित पाण्याचा पुरवठासुद्धा नियमित होताना दिसत नाही. आॅक्टोबर महिन्यातच आठ दिवसाआड व त्याहीपेक्षा अधिक कालावधीत पाणीपुरवठा सुरू आहे. परिणामी नागरिकांना पिण्यासाठी आजही पाणी विकतच आणावे लागत आहे. यामुळे असंतोष निर्माण झाला असून सातत्याने जीवन प्राधिकरण कार्यालयावर नागरिकांचे मोर्चे धडकत आहेत.मंगळवारी महिलांनी नगरसेवकांच्या नेतृत्वात जीवन प्राधिकरणवर मोर्चा काढला. गुरुवारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, संजय रंगे, नगरसेवक व शहर प्रमुख पिंटू बांगर, नगरसेवक उद्धवराव साबळे, प्रवीण पांडे यांच्यासह नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी कार्यकारी अभियंता अजय बेले यांना नळाद्वारे येत असलेल्या दूषित पाण्याचे नमूने आणून दाखविले. ते पाणी खरंच पिण्यायोग्य आहे काय, याचीही विचारणा केली. शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत व शुद्ध व्हावा, अशा मागणीचे निवेदन दिले. सोबतच परिस्थिती न सुधारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
जीवन प्राधिकरणावर सलग दुसऱ्या दिवशी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 9:50 PM
शहरात जीवन प्राधिकरणच्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे विविध आजारांची लागण झाली आहे. वापरण्यायोग्यही पाणी जीवन प्राधिकरण देत नाही. दूषित पाणीपुरवठा तत्काळ थांबवून नियमित शुद्ध पाणी द्यावे, या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशीही जीवन प्राधिकरण कार्यालयावर संतप्त नागरिकांचा मोर्चा धडकला.
ठळक मुद्देअशुद्ध पाणीपुरवठा : शिवसेनेने दिला कार्यकारी अभियंत्यांना अल्टीमेटम