जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : गोंडवाना संग्राम परिषदेचे आयोजन यवतमाळ : विदर्भातील ११ जिल्ह्याच्या भूभागावर गोंडराजाची सत्ता होती. गोंडराजाने या ठिकाणी ९५० वर्ष राज्य केले. अनेक राज्यांची भाषावार निर्मिती करण्यात आली. मात्र गोंड राज्याची निर्मिती जाणीवपूर्वक टाळण्यात आली. त्यामुळे गोंडवाना विदर्भ राज्याची निर्मिती करावी या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी गोंडवाना संग्राम परिषदेच्यावतीने यवतमाळात मोर्चा काढण्यात आला होता. हातात पिवळे झेंडे आणि दुपट्टा धारण केलेले मोर्चेकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. गोंडवाना संग्राम परिषदेच्यावतीने येथील टिळक भवनातून सोमवारी दुपारी ३ वाजता मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा हनुमान आखाडा, तहसील चौक, बसस्थानक चौक आणि पुन्हा टिळक भवनासमोर पोहोचला. या ठिकाणी मोर्चेकऱ्यांनी गोंडवाना विदर्भ राज्य झालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या. मोर्चात पारंपारिक वाद्यसह नृत्य करणारे कलावंत सर्वांचे लक्ष वेधत होते. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन मसराम, प्रदेशाध्यक्ष वासुदेवशाह टेकाम, बाबाराव मडावी, प्रवीण आडेकर, नामदेव कन्नाके, अंबादास सलामे, बाळकृष्ण गेडाम, बळवंत मडावी, बंडू मसराम यांनी केले. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले. (शहर वार्ताहर)
गोंडवाना विदर्भ राज्यासाठी मोर्चा
By admin | Published: May 02, 2017 12:01 AM