सर्वपक्षीय सहभाग : शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीची बैठकलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने दिलेली कर्जमाफी अत्यंत फसवी आहे. यात सर्व गरजू शेतकऱ्यांचा समावेश होणे शक्य नाही. आकड्यांचा खेळ करून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मारले आहे. त्यामुळे सरकारचा निषेध म्हणून १४ जुलै रोजी शंभर शेतकऱ्यांची शवयात्रा काढून अभिनव आंदोलन करण्याची घोषणा शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने पत्रपरिषदेत केली.मंगळवारी समितीची जिल्हा बैठक येथील नगरवाचनालयाच्या सभागृहात पार पडली. यात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह विविध संघटनांच्या नेत्यांनी हजेरी लावली. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार म्हणाले, सरकारने गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीतून बाद केले आहे. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शेतकरी शवयात्रा काढणार आहेत. १०० तिरड्यांवर शेतकऱ्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. आमदार बच्चू कडू, माजी आमदार वामनराव चटप, चंद्रकांत वानखडे आदी नेते या शवयात्रेत सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेला माजी आमदार विजयाताई धोटे, अॅड. प्रफुल्ल मानकर, जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत, यवतमाळ बाजार समिती सभापती रवींद्र ढोक, आर्णी बाजार समिती सभापती राजू पाटील, अशोक भुतडा, गोपाल चव्हाण, प्रमोद कुदळे, संतोष अरसोड, पुष्पा नागतुरे, विजयराज शेगेकर, रामचंद्र मडकाम, गुलाब उमरतकर, राजेंद्र हेंडवे, चंद्रकांत अलोणे, रूस्तम शेख, आदींची उपस्थिती होती.सत्ताधाऱ्यांना अंत्यदर्शनाची खास सोयशेतकऱ्यांची शवयात्रा आंदोलनात शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, बसपा, आरपीआय, बामसेफ, संभाजी ब्रिगेड आदींसह विविध संघटना सहभागी होणार आहे. मात्र सत्ताधारी भाजपा आंदोलनापासून दूर आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे अंत्यदर्शन घेता यावे याकरिता दत्त चौकात शवयात्रा काही काळ थांबविण्यात येईल. सत्ताधाऱ्यांनी दत्त चौकात येऊन अंत्यदर्शन घ्यावे, असे पत्रकार परिषदेत देवानंद पवार यांनी सांगितले.
फसव्या कर्जमाफीविरुद्ध १०० शेतकऱ्यांची शवयात्रा
By admin | Published: July 05, 2017 12:13 AM