लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली पोलीस स्टेशनच्या वतीने गडचिरोली शहरात रविवारी दारू विक्रेत्यांविरोधात धाडसत्र राबविण्यात आले. एकाच दिवशी नऊ ठिकाणी धाड टाकून ९ आरोपींना अटक केली आहे. एकूण ४७ हजारांची दारू जप्त केली.गडचिरोली पोलिसांनी ठोक दारू विक्रेत्यांच्या मुस्क्या आवळल्यानंतर मागील सहा महिन्यांपासून गडचिरोली शहरातील ठोक दारू विक्रेत्यांकडून केला जाणारा दारू पुरवठा बंद झाला आहे. मात्र किरकोळ दारू विक्रेते दारूची विक्री करीतच होते. त्यांचाही बंदोबस्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या नेतृत्वात ठाणेदार दीपरत्न गायकवाड, पोलीस उपनिरिक्षक लोहार, पाटील व पथकाने शहरभर धाडसत्र राबविले.गोकुलनगर येथील माया भाऊराव भरडकर (४५) व सोनू भाऊराव भरडकर (२०) यांच्याकडून ३० लिटर मोहाची दारू जप्त केली. तिच्याकडे दोन प्लास्टिक कॅनमध्ये दारू ठेवली होती. १०० रूपये प्रती लिटर प्रमाणे या दारूची किंमत तीन हजार रूपये एवढी होते.सुभाष वार्डातील मंगला गणेश पिपरे (३०) हिच्या घराची तपासणी केली असता, एका प्लास्टिक पिशवीत विदेशी कंपनीच्या १८० एमएल मापाच्या २० नगर निपा आढळल्या. प्रत्येकीची किंमत ३०० रूपये याप्रमाणे सहा हजार रूपये किमतीची दारू जप्त केली.नेहरू वार्डातील मंगला अरूण बावणे हिच्या घराची तपासणी केली असता, एका निळ्या रंगाच्या नायलॉन पिशवीत ४ हजार ५५० रूपयांची दारू आढळली. फुले वार्डातील वासुदेव नानाजी नवले (२९) याच्याकडे सात लिटर मोहाची दारू आढळली. नेहरू वार्डातील क्रिष्णा सिताराम बिंदे, शशिकला मोहन कोसनकर या दोघांकडून १५ हजार रूपये किमतीची दुचाकी व १ हजार ८०० रूपये किमीची दारू असा एकूण १६ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. रामनगर वार्डातील अनिल मारोती मोहुर्ले (३१) याच्याकडून ३ हजार ६०० रूपये किमतीची दारू जप्त केली. कनेरी टोली येथील विपूल विलास चन्नावार याच्याकडून नऊ हजार रूपये किमतीची दारू जप्त केली. गोकुलनगरातील गौतम लहुजी रामटेके (५३) याच्याकडून दोन हजार रूपये किमतीची मोहफुलाची दारू जप्त केली. लांझेडातील रमेश भाऊराव नैताम याच्याकडून ४ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.या सर्व आरोपींविरोधात महाराष्टÑ दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सोनू भाऊराव भरडकर हा आरोपी फरार आहे. इतर सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली.एकाचवेळी कारवाईने दारू विक्रेते हादरलेएकाच दिवशी पोलिसांनी धाडसत्र राबविल्याने दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. किरकोळ दारू विक्रेते दुचाकीने दारू आणत असल्याने व त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्यावर आळा घालणे ही कठीण बाब होती. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे व ठाणेदार दीपरत्न गायकवाड यांनी खबऱ्यांकडून माहिती काढून धाडसत्र राबविले. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी कारवाई होण्याची ही गडचिरोली पोलीस स्टेशनच्या इतिहासातील पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे दारू विक्रेते हादरले असून पुन्हा दारू विक्री करण्याची हिंमत ते करणार नाही, असा अंदाज आहे.
दारू विक्रेत्यांविरोधात गडचिरोलीत धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 10:08 PM
गडचिरोली पोलीस स्टेशनच्या वतीने गडचिरोली शहरात रविवारी दारू विक्रेत्यांविरोधात धाडसत्र राबविण्यात आले. एकाच दिवशी नऊ ठिकाणी धाड टाकून ९ आरोपींना अटक केली आहे. एकूण ४७ हजारांची दारू जप्त केली.
ठळक मुद्देनऊ आरोपींना अटक : एकाच दिवशी नऊ ठिकाणी केली कारवाई