लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अवैध दारू विक्री करणारे अनेक गुत्ते शहरात आहे. अशा गुत्त्यांवर स्पिरीटपासून बनविलेली देशी दारू विकली जात होती. ही बनावट दारू पुरविणाऱ्या टोळीचा पोलिसांना सुगावा लागला. थेट दारूच्या कारखान्यावर बुधवारी दुपारी अवधूतवाडी पोलिसांनी धाड टाकून चौघांना रंगेहात अटक केली. गोधनी परिसरातील निर्जनस्थळी हा कारखाना सुरू होता. पोलीस दप्तरी कुख्यात म्हणून नोंद असलेला दीपक उर्फ भैय्या राममनोहर यादव (३८) रा. देवीनगर लोहारा,योगेश पांडुरंगजी रेकलवार (३६) रा. गोधनी कोठा,अंकुश चिंतामण तिरमारे (२०) रा. देवीनगर लोहारा यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली. भैय्या यादव याने हा कारखाना थाटला होता. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या माध्यमातून ही बनावट दारू शहरातील विविध अवैध दारू गुत्त्यांवरून त्याची विक्री केली जात होती. स्पिरीट व इतर घातक रसायनांचा वापर करून ही दारू तयार करण्यात येत हेाती. २०० लीटर स्पिरीटपासून सहा ते सात लाख रुपयांची दारू तयार करून विक्री होत होती. हे स्पिरीट दिग्रसवरून खरेदी करीत असल्याचे आरोपीने सांगितले. बनावट दारू कारखान्याची माहिती खबऱ्याद्वारे पोलीस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार यांना मिळाली. पथकासह त्यांनी थेट गोधनी परिसरातील विरळ वस्ती असलेल्या भागातील हा कारखाना गाठला. शिताफीने चारही बाजूंनी घेरा टाकून कारखान्यात प्रवेश केला. तेथे दीपक यादव हा इतर तीन साथीदारांसह दारू बनविताना रंगेहात सापडला. घटनास्थळावरून देशी दारूच्या रिकाम्या बॉटल, काही भरलेल्या बॉटल, २०० लीटर स्पिरीट, दारू सारखा रंग व वास येण्यासाठी वापरले जाणारे इसेन्स, सील करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, चारचाकी वाहन, दोन दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. एसडीपीओ संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई ठाणेदार मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार, जमादार नासीर शेख, बगमारे, सुधीर पिदूरकर आदींनी केली.
टिन पत्र्याच्या शेडचा वापर - बनावट दारू तयार करण्यासाठी टिनाच्या शेडचा वापर केला. घर बांधकामासाठी साहित्य ठेवण्याकरिता तयार केलेले हे शेड बनावट दारू कारखान्यात रुपांतरित केले. मागील काही महिन्यांपासून हा कारखाना सुरू असल्याची माहिती आरोपींनी दिली. दारूसाठी लागणारे स्पिरीट व इतर घातक रसायन कोठून आणले याचा शोध पोलीस घेत आहे.
भंगारातून मिळविल्या रिकाम्या बॉटलn मान्यता प्राप्त दारू कारखान्यात बॉटलिंग झाली असावी असे पॅकिंग आरोपींकडून केले जात होते. भंगारातून दारूच्या रिकाम्या बॉटल खरेदी करून त्यात बनावट दारू भरली जात होती. नंतर त्याला सील करून लेबलिंग केले जात होते. वितरणासाठी मुले ठेवून यंत्रणा उभी केली होती. याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
बनावट दारूमुळे थेट मृत्यूला निमंत्रण स्पिरीटपासून बनविलेली दारू अधिक घातक असून यामुळे लिव्हर कॅन्सर, लिव्हर सिरोसीस या सारखे दुर्धर आजार होतात. लिव्हर निकामी झाल्यानंतर पोटात पाणी जमा होते. रक्ताच्या उलट्या होतात. शरीरातील रक्त कमी होते, हातापायावर सुज येते, प्रचंड वेदना होऊन रुग्णांचा मृत्यू होतो. - डॉ. बाबा येलकेविभाग प्रमुख औषधी वैद्यक शास्त्र, यवतमाळ