सामाजिक ऐक्य : १९०५ मध्ये गणेश मंडळाची पुसदमध्ये स्थापना अखिलेश अग्रवाल पुसदलोकमान्य टिळकांपासून प्रेरणा घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सलग १११ वर्षांपासून सामाजिक प्रबोधनाचे कार्य येथील गणबादेव गणेश मंडळ करीत आहे. यावर्षीही या मंडळाने परंपरागत पद्धतीने गणेशाची स्थापना केली असून पुसदच्या वैभवात भर टाकली आहे. लोकमान्य बाळगंगाधर टिकळ यांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली. त्याला आता १२२ वर्ष झाली आहेत. त्यांच्याच प्रेरणेतून पुसद येथे दत्तराव पाटील यांनी सर्वप्रथम गणबादेव सार्वजनिक गणेश उत्सवाला प्रारंभ केला. १९०५ मध्ये पूस नदीच्या तीरावर दत्तराव पाटील यांनी गणेश मंडळाची स्थापना केली. कोणत्याही कार्याच्या प्रारंभी पूजनीय असलेल्या गणेशावर पाटील घराण्याची अपार श्रद्धा होती. डोक्यावर पगड्या, कपाळी गंध, हाती टाळ अन् मृदुंगाच्या ठेक्यात गणबादेवाचे पुसदमध्ये आगमन झाले होते. हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या या मंडळाचा रथ मुस्लीम कारागिरांनी तयार केलेला आहे. गत १११ वर्षांपासून गणबादेवाची पालखी भक्तीभावाने आजही भोई वाहतो. गणेशोत्सव हे समाज प्रबोधनाचे माध्यम समजून सामाजिक व सांस्कृतिक उभारणीत या मंडळाचा मोठा वाटा आहे. आज गणेशोत्सवाच रुप बदलले आहे. मूर्ती, डिजे, ढोलताशे, रोषणाई यावर लाखो रुपये खर्च होत आहे. मात्र गणबादेव मंडळाने १११ वर्षापूर्वीची आपली परंपरा आजही कायम ठेवली आहे. परंपरागत पद्धतीनेच गणरायाचे आगमन होते. त्यानंतर दहा दिवस कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, कथाकथन, भारुड आदींच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. गेल्या चार पिढ्यांपासून हा गणेशोत्सव समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहे. विशेष म्हणजे आजही या मंडळाची मूर्ती मातीपासूनच तयार केलेली असते. गणबादेवाची मूर्ती एका आकाराची असून या मंडळाला नारायणराव ताजनेकर यांनी विनामूल्य पुरविली आहे. त्यानंतर त्यांचे चिरंजीव लक्ष्मणराव ताजनेकर आणि आता त्यांची मुले ही परंपरा सांभाळत आहे. आजही पुसदचा मानाचा गणपती म्हणून उत्सवात अग्रस्थानी गणबादेवच असतो. त्या पाठोपाठ इतर गणेश मंडळे सहभागी होतात. पुसद शहराच्या वैभवात भर घालणे हे मंडळ समाज प्रबोधनातही आघाडीवर आहे.
गणबादेव गणेश मंडळाची १११ वर्षांची परंपरा
By admin | Published: September 21, 2015 2:31 AM