दारव्हा : नालीवरील रपटा दुरुस्तीसाठी शहरातील युवकांनी गांधीगिरी केली. त्या खड्ड्यात चक्क पूजा केली.
शहरातील अंबिकानगरातील नालीवरील रपट्याला खड्डा पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा रपटा दुरुस्त करण्यात येत नसल्याने काही युवकांनी गांधीगिरी करीत या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अंबिकानगरात बुद्ध विहाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर जड वाहनांमुळे नालीवरील रपट्याला मोठा खड्डा पडला. हा रस्ता अंतर्गत वाहतुकीचा आहे. त्यामुळे या ठिकाणी दिवसभर वर्दळ असते.
खड्ड्यामुळे नेहमीच अपघात घडत आहे. त्याचबरोबर या रस्त्यावरून चारचाकी वाहनही जाऊ शकत नाही. नागरिकांची अडचण होत असताना जवळपास दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही लोकप्रतिनिधी आणि नगर परिषद प्रशासनाने लक्ष देऊन रपटा दुरुस्त केला नाही. त्यामुळे नगरातील युवकांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्याभोवती चुन्याने रंगरगोटी करून पूजन केले. खड्ड्याला हारार्पण करून गांधीगिरी आंदोलन केले. किमान आता तरी या रपट्याची दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या आंदोलनात स्वप्निल राठोड, पवन शेबे, संदीप शिले, परेश मनवर, पवन कटके, शुभम चंदन, अनुज शेंडे, गौरव गुल्हाने आदी युवक सहभागी झाले होते.