लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पुसद शहरातील पुष्पावंतीनगरीत गणेशोत्सवात तब्बल ११४ वर्षांपासून सर्वधर्म समभावाची परंपरा जोपासली जात आहे. पूस नदीतीरावरील हटकेश्वर वॉर्डात १९०५ पासून पुसदचे ग्रामदैवत म्हणून ख्यातीप्राप्त मानाचा गणबादेव गणपतीची स्थापना केली जाते. यातून ही परंपरा जोपासली जात आहे.शहराची जीवनदायिनी म्हणून पूस नदीची ख्याती आहे. या नदीकाठावरील हटकेश्वर वॉर्डात १९०५ मध्ये शेतकरी पूत्र धारू पाटील यांनी गणबादेवाची पहिल्यांदा स्थापना केली. त्यानंतर सखाराम पाटील, दत्तराम पाटील, शेषराव पाटील व सध्या शरद पाटील गणबादेवाची परंपरेने स्थापना करीत आहे. गणबादेवाच्या स्थापनेसाठी खास रथाची निर्मिती करण्यात येते. यावर्षी किनवट येथील मुस्लीम कारागिर सरफराज शेख याने रथाची निर्मिती केली आहे. या रथावरून वाजतगाजत गणबादेवाची मिरवणूक काढून स्थापना केली जाणार आहे. गेल्या पाच पिढ्यांपासून भोई समाजबांधव हा रथ ओढत आहे.पुसदचे ग्रामदैवत म्हणून आता गणबादेवाची गणना केली जाते. हा गणबादेव गणपती सामाजिक सलोख्याचा समाजापुढे आदर्श ठेवत आहे. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यातूनही सर्वधर्म समभावाचा संदेश दिला जातो. याच गणपतीने राज्य शासनाचा उत्कृष्ट गणपती पुरस्कार पटकावून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. येथील ग्रामदैवत असलेल्या गणबादेवाची कीर्ती दिवसेंदिवस शहरासह इतरत्र पसरत आहे. यामुळे भाविकांची संख्या वाढत आहे. सध्या गणबादेव गणेश मंडळाची धुरा शरद पाटील, सुधाकर वाशीमकर, चंद्रकांत शेता, अनिल पाटील, सतीश पंडितकर, सुदेश सांबरे, सुरेश चौधरी, संजय पाटील, ऋषीकेश पंडितकर, दीपक देशमुख, अॅड.विनोद पाटील आदी सांभाळत आहे. दरवर्षी पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीच हाच गणबादेव अग्रस्थानी असतो, हे विशेष! त्याला बघण्यासाठी दरवर्षी मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी उसळते.
१४ किलो चांदीचे सिंहासनगणबादेव गणेश मंडळाने गणबादेवाची स्थापना करण्यासाठी तब्बल १४ किलो चांदीचे रत्नजडित सिंहासन बनविले आहे. गेल्या काही वर्षांपासून याच सिंहासनावर गणबादेवाची स्थापना केली जाते. गणबादेवाला ११ ग्रॅम सोन्याचे दंत बसविले जातात. त्यामुळे गणबादेव पुसदकरांच्या गळ्यातील ताईत ठरले आहे. गणबादेवाच्या दर्शनासाठी तालुक्यासह परिसरातील नागरिक दरवर्षी गर्दी करतात.