रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण शहरात पाण्यासाठी मारामार सुरू आहे. शेजाऱ्यालाही गुंडभर पाणी देण्याची तयारी दर्शविली जात नाही. सार्वजनिक नळाला कुलूप लावले जाते. काही जण टाक्यांना कुलूप लावत आहे. असे असले तरी, काही व्यक्तींनी मोबदला न घेता अविरत पाणी वाटप सुरू केले आहे. कुठलाही गाजावाजा न करता त्यांनी लोकवर्गणीतून सक्षम यंत्रणा उभी केली आहे.लोहारा परिसरातील उद्योगनगरच्या कोलाम पोडावर पाण्याची भीषण टंचाई आहे. २७०० लोकसंख्या असलेल्या या भागातील कोलाम बांधवांची घरे कुडामातीची आहेत. त्यांच्या घरात जेवनासाठीची भांडी नाही, तर पाणी साठवण्यासाठी टाक्या कुठून असणार. पालिकेच्या हद्दवाढीतून हा भाग वगळला आहे. सरकारी यंत्रणेतील एकही टँकर या भागात फिरकत नाही. यामुळे काही नागरिकांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. एक दोन दिवसांसाठी टँकरची व्यवस्थाच नाही तर कायमस्वरूपी व्यवस्था म्हणून लोकवर्गणीतून वाढीव पाईप लाईन सुरू केली आहे.या पाण्यावर गरज पूर्ण होत नाही म्हणून स्वतंत्र टँकरची व्यवस्था लोकवर्गणीतून करण्यात आली. टँकरने प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविले जाते. आवश्यक तेवढे पाणी त्यांना देण्यात येते. हद्दवाढीतुन वगळल्यापासून या भागातील नागरिकांचा मुलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संजय चव्हाण, गणेश कानोड, राजू कट्यारमल, बबलू देशमुख यानी पुढाकार घेऊन काम सुरू केले. दीड लाखांची लोकवर्गणी गोळा केली. यातून या भागामध्ये वाढीव पाईपलाईन आणि स्टँडपोेज दुरूस्ती केली आहे. बबलू देशमुख यांच्या बोअरवरून या भागात पाणी पुरविले जात आहे. दुसरी बोअर करून पाणी वाटपाचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न आहे.मागील तीन वर्षांपासून या भागाच्या विलिनीकरणासाठी काही मंडळी झटत आहे. आता अलीकडे जिल्हा परिषदेने हा संपूर्ण भाग ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असल्याचे म्हटले आहे. यामुळे या भागावर ग्रामपंचायतीचे नियंत्रण राहणार आहे. दरम्यान, या भागाला पाणी वितरणासाठी पंचायत विभागाने टँकरची व्यवस्था केली आहे.टँकर आल्याची घरोघरी सूचनाया भागात पाणी वितरणासाठी विशेष पध्दत आहे. टँकर पोहोचताच घरोघरी सूचना दिली जाते. टाकी नाही म्हणून पाणी देणे टाळले जात नाही. घरातील लहान मोठे भांडे भरेपर्यंत टँकर उभे राहते.लोकसहभागातून टंचाईवर मातसंपूर्ण शहरातील पाणी टंचाई आणि लगतच्या भागातील भीषणता पाहता अंगावर शहारे येतात. आमच्या भागात अशीच स्थिती राहिली असती. लोकसहभाग आणि पुढाकाराने त्यावर मात करता आली, असे अनिता भैरट, आशा खंदरकर, सिंधू बडदे, सावित्री तापसे, प्रतिभा खंदरकर, पुष्पा कुकडे, पायल शिंदे, जयश्री कानोडे, पुष्पा टेकाम, जोत्सना डोईजड, सीमा काकडे, रेखा येरावार, रत्नमाला मेश्राम म्हणाल्या.
भगीरथ प्रयत्नाने अवतरली कोलाम पोडावर गंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:52 PM
संपूर्ण शहरात पाण्यासाठी मारामार सुरू आहे. शेजाऱ्यालाही गुंडभर पाणी देण्याची तयारी दर्शविली जात नाही. सार्वजनिक नळाला कुलूप लावले जाते. काही जण टाक्यांना कुलूप लावत आहे. असे असले तरी, काही व्यक्तींनी मोबदला न घेता अविरत पाणी वाटप सुरू केले आहे.
ठळक मुद्देप्रत्येक भांडे भरेपर्यंत वाटतात पाणीलोहाराच्या उद्योगनगरात प्रेरणास्रोत