लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शुक्रवारी सकाळपासूनच यवतमाळ शहरात गणेशभक्तांची गर्दी पहायला मिळत होती. कोरोनामुळे नियमांचे पालन करीत मंडळांनी अतिशय साध्या पद्धतीने गणरायाची स्थापना केली. बॅन्ड आणि ढोलताशा पथक नसले तरी गणरायाचा जयघोष करीत भक्तांनी गणेशमूर्तीची विधिवत स्थापना केली. स्थानिक पोस्टल ग्राउंड मैदानावर मूर्तिकारांची आणि खरेदीदारांची सर्वाधिक गर्दी पहायला मिळाली.जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हाभरात कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस प्रशासन आणि नगरपालिका यांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना होत्या. त्या दृष्टीने शहरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. सार्वजनिक गणेश मंडळाच्या तुलनेत घरगुती गणेशमूर्तीची स्थापना करणाऱ्या भाविकांची संख्या यावर्षी सर्वाधिक पहायला मिळाली. त्या दृष्टीने मूर्तिकारांनीही मोठ्या प्रमाणात छोट्या मूर्ती बनविल्या होत्या. गणरायाच्या मूर्तीच्या किमती यावर्षी वाढ झाल्याचे चित्र होते. मूर्ती स्थापनेसोबतच सजावट साहित्यही महागल्याचे चित्र स्थानिक बाजारात होते. यामुळे भाविकही संकटात सापडले होते. लालमातीची मूर्ती खरेदी करण्यावर ग्राहकांचा सर्वाधिक कल राहिला. याशिवाय शहरातील नामवंत मूर्तीकारांकडे सकाळपासूनच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. गणरायाचे आगमन होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. मात्र मूर्तीची उंची मर्यादित असल्याने नियमानुसार मूर्तीची निर्मिती करण्यात आली होती. मोजकेच कार्यकर्ते गणरायाची मूर्ती नेण्यासाठी मूर्तीकारांकडे पोहोचल्याचे चित्र आज शहरातील विविध भागांत पहायला मिळाले. गणरायाच्या स्वागतासाठी कलावंतांनी मुख्य रस्त्यावर रांगोळी काढून लक्ष वेधले होते.
शासकीय सुटीने मंडळांपुढे परवानगीचा पेच - गणरायाची मूर्ती स्थापन करताना धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून परवानगी घ्यावी लागते. परवानगीसाठी आयुक्त कार्यालयाने विविध नियम घातले आहेत. त्यामुळे मूर्तीची स्थापना करताना मंडळांपुढे पेच निर्माण झाला होता. यामुळे गुरुवारपर्यंत केवळ १५८ मंडळांचे अर्ज आले. त्यापैकी ५३ मंडळांना परवानगी मिळाली. आता इतर मंडळांनाही नोंदणी करायची आहे. मात्र शासकीय सुटी असल्याने अनेक मंडळे अडचणीत आली आहे.