एकनाथ पवार ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : ऊन्ह, वारा, पाऊस, कडाक्याची थंडी सोसत रस्त्यावर खडा पहारा देणाऱ्या पोलिसांचा घरचा गणपती बंदोबस्ताच हरविला. अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परंपरेनुसार घरी गणपती स्थापना केली. मात्र त्यांना बंदोबस्तातून वेळच मिळत नाही.पोलिसांचे दुखणे कधीच कुणी जाणून घेत नाही. बंदोबस्तात तर प्रचंड आबाळ होते. वेळेवर जेवण नाही, की झोप नाही. प्रकृती बिघडली तरी कुणाला सांगावे, असा प्रश्न. आता गणेशोत्सवात २४ तास पोलीस बंधू कर्तव्य बजावीत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक सणासुदीचा आनंद घेताना दिसत आहेत. मात्र या पोलिसांच्या नशीबी स्वत:च्या घरातील गणेशाची आरती करण्याचेही सौभाग्य नाही. अनेकांनी याबाबत खंत व्यक्त केली. मात्र जनतेची सेवा हेच आपले प्रथम कर्तव्य असल्याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळेच घरचा गणपती जागीच ठेवून ते भाविकांच्या सुविधेसाठी रस्त्यावर पहारा देत आहेत.सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. घराघरांत श्रींची स्थापना झाली. मात्र प्रत्येक सणापासून वंचित राहणारा पोलीस हा एकमेव घटक. त्यांच्या सुख, दु:खाकडे कुणाचेच लक्ष नाही. ते आपली व्यथा कुणाजवळ व्यक्त करू शकत नाही. गणेशोत्सवात घरी श्रींची स्थापना करूनही आरतीचे सौभाग्य त्यांना कधीच मिळत नाही. २४ तास बंदोबस्तात असल्याने सण किंवा उत्सव, ही संकल्पनाच त्यांच्या जीवनातून कालबाह्य होत आहे. पोळा असो, की दिवाळी, ईद असो, की नवरात्र, त्यांना घरी जाताच येत नाही. बंदोबस्तामुळे पोलिसांसह त्यांचे आई-वडील, पत्नी, मुला-बाळांचे स्वास्थ्य हरविले आहे. शहरात बंदोबस्तासाठी १० अधिकारी, ३५० पोलीस आणि १० होमगार्ड २४ तास सेवा देत आहेत. महिला कर्मचाऱ्यांची हौस अपूर्णचगणरायाच्या आगमनापूर्वी हरतालिका असते. तथापि महिला कर्मचाऱ्यांना उपवासही करता येत नाही. वर्षभर अंगावर खाकी असल्याने त्यांना सणासुदीला साडी घालण्याची हौसही कधी पूर्ण करता येत नाही.वाहतूक पोलिसांची होतेय दमछाकशहरातील वाहने आणि लोकांचे लोंढे सांभाळत वाहतुकीचे नियोजन करताना वाहतूक पोलिसांची दिवसभर दमछाक होते. सकाळपासून रस्त्यावरील नागरिकांची गर्दी ओसरेपर्यंत त्यांना नियोजन करावे लागते. रस्त्यावर उभे राहून चौकाचौकात शिट्टी वाजवीत, हातवारे करावे लागते. यामुळे ते थकून जातात. पायात गोळे आले तरी निमूटपणे सहन करीत त्यांना कर्तव्य बजावावे लागतात.
बंदोबस्तातच हरविला पोलिसांचा गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:22 PM
ऊन्ह, वारा, पाऊस, कडाक्याची थंडी सोसत रस्त्यावर खडा पहारा देणाऱ्या पोलिसांचा घरचा गणपती बंदोबस्ताच हरविला. अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परंपरेनुसार घरी गणपती स्थापना केली. मात्र त्यांना बंदोबस्तातून वेळच मिळत नाही.
ठळक मुद्देगणेश जागीच : घरचा विघ्नहर्ता सोडून अहोरात्र कर्तव्यावरच