यवतमाळ - नगपरिषदेचा एकूण कारभार आर्थिक दिवाळखोरीत असल्याने येथे दैनंदिन कामासाठी सुध्दा पैसा शिल्लक नाही. त्यामुळे वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणाने शहरातील कचरा संकलनाची यंत्रणा ठप्प होत आहे. विधानसभा निवडणूकीत सत्ताधारी भाजपाला विरोधक कचरा कोंडीसाठी जबाबदार धरत आहेत. तर दुसरीकडे वेतन नसल्याने घंटागाडी चालकांनी पुन्हा कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
शहरातील कचरा संकलनासाठी ६५ घंटागाड्या सुरू आहेत. यावर कार्यरत चालकांना वेळेत वेतन न मिळाल्याने त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले असून घंटागाड्या थेट नगरपरिषद कार्यालयासमोर लावल्या आहेत. याबाबत आरोग्य विभागातील निरिक्षकाने कंत्राटदाराला देयक दिल्यानंतरही चालकांचे वेतन दिले नाही. त्यामुळे ही समस्या उभी ठाकल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी संपूर्ण पावसाळा कचरा डेपोची जागा नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग लागले होते. आता वेतन नसल्याने कचरा संकलन बंद झाले आहे.
नगरपरिषदेतही भाजपाची सत्ता असून येथील कारभार पूर्णत: ठेपाळल्याचा आरोप सातत्याने होत आहे. अनेक चुकीच्या निर्णयामुळे पालिका आर्थिक दिवाळखोरीत निघाली आहे. स्वच्छताच नव्हे तर इतर ही कंत्राटदारांच देयके देण्याची सोय नगरपरिषदेकडे नाही. आता घंटागाडी चालकांचा संप कोणत्या पद्धतीने थांबवून शहरातील कचरा संकलन पुर्ववत केले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक प्रचाराकरता विरोधकांना आयता मुद्दा
ऐन विधासभा निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असताना विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे. तसेही या विधानसभेत शहरात तुंबलेला कचरा, पाणी, रस्त्याची समस्या चांगली गाजली. त्यावरून विरोधक सत्ताधारी उमेवाराला लक्ष्य करत आहे. आता पुन्हा घंटागाड्या बंद झाल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागले आहे.