यवतमाळ : शहरालगत असलेल्या नागपूर रोडवरील कळंब चौक परिसरातील कुंभारपुरा, नवाबपुरा भागात मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजाचे वास्तव्य आहे. या परिसरात कचरा साचल्याने आता हाच कचरा जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या मुस्लीम समाजाचा पवित्र महिना रमजान सुरू आहे. या महिन्यात मुस्लीम बांधव ईबादतमध्ये मश्गुल राहतात. मात्र, या परिसरात अंदाजे तीन महिन्यांपासून नगरपरिषदेने साफसफाई केली नाही. त्यामुळे या परिसरात नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत. अनेक ठिकाणी कचराऱ्याचे ढीग पडलेले आहे. यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे.
नगरपरिषदेने त्वरित या परिसरातील कचरा उचलला नाही आणि नाली सफाई केली नाही, तर परिसरातील नागरिक जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोर हा कचरा टाकतील, असा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना या समस्येचे निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनावर जाकीर भाई पेटिवाले, मो.मतीन, शेख अन्सार, शेख मुश्ताक, शेख सादीक, सालिक पटेल, मो.मोईन, आदील खान, अबरार खान, मो.सलीम, मो.हकीम आदींच्या स्वाक्षरी आहे.