यवतमाळ : अनेक दिवसांपासून फुलसावंगी येथील ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे आहे. याबाबत काही युवकांनी सरपंच व उपसरपंच यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर राहावे, असे निवेदन दिले होते. मात्र, निवेदन देऊनही सरपंच, उपसरपंच यांच्या कार्यपद्धतीत बदल न झाल्याने संतप्त युवकांनी शनिवारी त्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून निषेध नोंदविला.
फुलसावंगी ही महागाव तालुक्यातील सर्वात मोठी १७ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. शीतल भिसे सरपंच, तर नवाब जानी कमरबेग उपसरपंच आहे. ग्रामस्थांना कोणतेही काम असले, तर सरपंच यांच्या घरी जाऊन स्वाक्षरी आणावी लागो. त्यांच्या घराच्या पायऱ्या झिजव्याव्या लागत. सरपंच मासिक सभा वगळता उपस्थित राहत नाहीत. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य ग्रामस्थांना होतो, असा आरोप युवकांनी केला.
सोहेल नवाब यांनी सरपंचांना दिवसातून काही तास ठरावीक वेळेत कायार्लयात हजर राहण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र, त्यांनी निवेदनाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकांनी शनिवारी सकाळी सरपंच, उपसरपंच यांच्या खुर्चीला चपलांचे हार घालून निषेध नोंदविला यावेळी शे. अनिस, सोहेल नवाब उपस्थित होते. या संदर्भात सरपंचांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या शुक्रवारपासून बाहेरगावी गेल्याची माहिती मिळाली.
हा प्रकार असंवैधानिक
फुलसावंगी ग्रामपंचायतीत झालेला प्रकार असंवैधानिक असून समस्या सोडविण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध होते, असे ग्रामसेवक बालाजी जोगदंड यांनी सांगितले. या निषेधच्या चौकशी अंती योग्य ती कायदेशीर कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अद्याप या घटनेची माहिती माझ्यापर्यंत आली नाही. माहिती मिळाल्यानंतर सविस्तर सांगता येईल.
जी.एस. ठाकूर, गटविकास अधिकारी, महागाव