यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बुधवारी दुपारी ४:३० वाजता भारी (यवतमाळ) येथे महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी महिलांसह नागरिकांची कार्यक्रमस्थळी गर्दी होत आहे. दुपारी १२ वाजतापासूनच विविध साधनांद्वारे नागरिक या ठिकाणी दाखल होत आहेत.
याच मेळाव्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी ४:३० वाजतापासून विविध योजनांचे लोकार्पण, प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. याशिवाय महिला बचत गटांना ई-वाहतूक वाहने, ड्रोन फवारणी यंत्राची चावी दिली जाणार आहे.
बचत गटाच्या महिलांना मेळाव्याला उपस्थित राहता यावे यासाठी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या माध्यमातून मोठ्या संख्येने महिला वर्ग मेळावास्थळी दाखल होत आहेत. कार्यक्रमस्थळी दोन तास आधीच पोहोचण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याने नागरिकांचीही घाई सुरू असतानाचे चित्र मेळावास्थळी दिसत होते. मेळाव्यानिमित्त पंतप्रधानांसोबत लोकप्रतिनिधींसह जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी मंचावर उपस्थित राहणार आहे.