रस्ता रोकोचा इशारा : पोलीस अधीक्षकांना पाठविले निवेदनपार्डी : पोफाळी पोलीस ठाण्याअंतर्गत गौळ (खुर्द) येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळली जात असून त्याची खुलेआम विक्री होत आहे. त्यामुळे गावातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. याचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागतो. त्यामुळे आता दारुबंदीसाठी महिलांनी पुढाकार घेतला असून शेकडो महिला पोलीस ठाण्यावर धडकल्या. दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. कुटुंबातील कर्ता दारुच्या आहारी गेल्यामुळे मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून गावातील १०० ते १५० महिला पोफाळी पोलीस ठाण्यावर धडकल्या. त्यांनी ठाणेदार ल.हु. तावरे यांना निवेदन देऊन गावातील दारू कायमची बंद करण्याची मागणी केली आहे. २० सप्टेंबरपर्यंत दारुभट्ट्या बंद न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर दारुबंदी महिला मंडळाच्या अध्यक्ष भागीरथाबाई टाकरास, सचिव प्रतीभा कांबळे, शांताबाई गडदे, प्रिती मुधोळकर, सुशीलबाई हराळे, विमलबाई जाधव, सुरेखा मेटकर, मंगला हराळ, संगीता नवघरे, सुकेशना कांबळे, सरपंच संतोष जाधव, पोलीस पाटील पंडीत आडतकर, उपसरपंच बाळू गव्हाणे, माजी सरपंच नंदकुमार हराळ, ग्रामपंचायत सदस्य बाळू राठोड, यशवंत जाधव यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
दारुबंदीसाठी गौळच्या महिला ठाण्यावर
By admin | Published: September 18, 2016 1:26 AM