पांढरकवडा : गौरी व गणपती विसर्जनासाठी येथील नगरपरिषदेतर्फे सात ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी शहराच्या विविध सात भागात कृत्रिम विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहेत.
सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच पावसाळ्याच्या दिवसात डेंग्यू, मलेरियासारख्या विविध आजारांची साथ सुरू आहे. अशातच सध्या सुरू असलेले विविध धार्मिक उत्सव व सणासुदीचे दिवस लक्षात घेता, नगरपरिषदेने पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी तसेच एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये व सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे, यादृष्टीने उपाययोजना केली आहे. यासाठी श्री गणेश व गौरी पूजन उत्सवादरम्यान शहराच्या विविध भागात विसर्जन व्यवस्था केलेली आहे. शासनाच्या निर्देशानुसार काही मार्गदर्शक सूचनाही करण्यात आल्या आहेत. शहरातील नागरिकांना याबाबत कळविण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता व कोणतीही दुर्घटना घडू नये, याकरिता प्रशासनाच्या निर्देशानुसार पांढरकवडा शहरातील गणेशमूर्तींचे विसर्जन व गौरी विसर्जन खुनी नदीच्या पात्रात न करता नगरपरिषदेतर्फे विसर्जन व्यवस्था करण्यात आलेल्या सात ठिकाणांपैकी कुठेही करावे, अशी विनंती करण्यात आली. यासाठी शिबला पॉईंट, सिंघानियानगर, आखाडा वाॅर्डातील मुलींच्या वसतिगृहाजवळ, सावरकर चौक (एचडीएफसी बँकेजवळ), चिंतामणी लेआउट (डॉ. तोडासे यांच्या दवाखान्याजवळ), राम मंदिरजवळ (महादेव घाट रोड), इमाम डोह (शंकर सातपुते यांच्या घराजवळ) या सात ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहे. पर्यावरणीय प्रदूषण होऊ नये व कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून गौरी विसर्जन तथा श्री गणेशमूर्ती विसर्जन नदीपात्रात करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणपती-गौरी उत्सवादरम्यान जमा होणारे निर्माल्य अथवा निकामी पूजेचे साहित्य इतरत्र किंवा नदीपात्रात न टाकता श्री गणपती मूर्ती विसर्जनस्थळी निर्माल्य कुंडीतच टाकावे, अशी विनंती नगराध्यक्षा वैशाली नाहाते व मुख्याधिकारी राजू मोट्टेमवार यांनी केली आहे.