महागाव : तालुका शेतकरी सहकारी जिनिंग- प्रेसिंग सहकारी संस्थेची आमसभा बुधवारी ९ जून रोजी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
संस्था अवसायानात गेल्यानंतर शासन नियुक्त संचालक मंडळ संस्थेचे कामकाज पाहत आहे. दरम्यान, जिल्हा बँकेने संस्थेकडील कर्जाच्या वसुलीपोटी हिवरा येथील जिनिंग लिलाव करून पैसे वसूल केले होते. तो व्यवहार अद्यापही वांध्यात आहे.
कोर्ट-कचेरीनंतर जिल्हा बँकेने जिनिंग सहकारी संस्थेला कर्जवसुलीतून उर्वरित रक्कम हस्तांतरित केली आहे. सहकारी संस्थेजवळ कोट्यवधीची मालमत्ता असून, या मालमत्तेवर अनेकांचा डोळा आहे. आमसभा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्यामुळे अनेक सभासदांना पाहिजे ते प्रश्न विचारता येणार नाहीत किंवा त्याचे उत्तरदेखील मिळणार नसल्यामुळे सभासदांमध्ये नाराजी आहे.
मात्र, प्रश्नांची सरबत्ती होणार नसल्यामुळे कार्यरत संचालक मंडळात समाधान झळकत आहे. शहरातील जिनिंगची जागा प्लॉटिंगकरिता विक्री करण्याचा प्रस्ताव समोर करण्यात आला होता; परंतु संस्थेचे सभासद संचालक ॲड. गजेंद्र देशमुख यांनी विरोध दर्शवून संस्थेमार्फत काहीतरी नवीन उद्योग सुरू करावा, अशी मागणी केली आहे.