लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेंतर्गत ४३६ रुपयात विमा संरक्षण दिले जाते. यात विमा संरक्षण घेतलेल्या कुठल्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारात मृत्यू झाल्यास योजनेतून दोन लाखापर्यंत लाभ मिळणार आहे. यासाठी लाभार्थ्याला दरवर्षी योजनेत समाविष्ट होण्यासाठी रिनिव्ह करावे लागणार आहे.
१८ ते ५० वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेत समाविष्ट होता येते. या योजनेत समाविष्ट झालेल्या लाभार्थ्यांचे बँक खाते अथवा पोस्ट खाते असणे बंधनकारक आहे. या खात्यातून लाभार्थ्यांचे पैसे थेट विमा रकमेत वळते होतात. या योजनेत वर्षाकाठी लाभार्थ्याला ४३६ रुपये भरावे लागतात. या योजनेत विमा रक्कम जमा झाल्यानंतर वर्षभराकरिता दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. आतापर्यंत तीन हजार ९४४ नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे.
काय आहे प्रधानमंत्री जीवनज्योती योजना प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेत १८ ते ५० वर्षे वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. या योजनेत ४३६ रुपयात वर्षभराकरिता दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. अपघाती निधन झाल्यावर ही मदत मोलाची ठरते.
क्लेम कसा आणि कुठे करणार योजनेत क्लेमसाठी पोस्टमास्तरकडे अर्ज करायचा आहे. डेथ संदर्भात नॉमिनी अर्ज करायचा आहे. यानंतर या योजनेत पात्र लाभार्थ्यांच्या वारसाच्या खात्यात ही रक्कम वळती होते.
तीन हजार ९४४ जणांनी भरले पैसे या योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील तीन हजार ९४४ जणांनी प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेतून स्वतःचे विमा संरक्षण करून घेतले आहे. या योजनेत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सोपी आणि सरळ आहे. यातून कुटुंबाला मदत होणार आहे.
"या योजनेकरिता अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी मोजकीच रक्कम वर्षभरासाठी गुंतवावी लागते. यामुळे ही योजना सर्वांना सोयीची ठरणारी आहे."- गजानन जाधव, डाक अधीक्षक, यवतमाळ