फोटो
दिग्रस : अहो काका, लस घेतली का? आपल्या गावातल्या सरकारी दवाखान्यात कोरोनाची लस आली आहे. दवाखान्यात या लस घ्यायला. लस घ्याल तरच कोरोनापासून वाचाल आणि नातवाचं लग्न पाहाल, अशी जनजागृती तालुक्यातील हरसूल येथे केली जात आहे.
हरसूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातून तीन दिवस कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस लसीकरणासाठी निश्चित करण्यात आले आहेत. सकाळी ११ पासून लसीकरणाला सुरुवात होते. शुक्रवारी ज्येष्ठांनी लस घेतली. लसीकरणाचा हा तिसरा दिवस होता.
प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरणासाठी नाव नोंदणीचीही व्यवस्था आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आधार कार्ड घेऊन आरोग्य केंद्रावर येण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष पाटील यांनी केले. आरोग्य कर्मचारी संगीता दरेकर, सुनीता गोरे-पुसांडे, गजानन हेलगीर, शिवाजी श्रीरामे, महेश ढोले, सुनील महल्ले हे लसीकरणाचे काम पाहात आहेत. लसीकरणानंतर वृद्धांचे समुपदेशनही केले जात आहे.