काशीनाथ लाहोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करण्यात नथुराम गोडसे, नारायण आपटे यशस्वी झाले असले तरी त्यापूर्वी त्यांनी गांधीजींना मारण्यासाठी सहावेळा हल्ले केले होते. यापैकी चार हल्ल्यात प्रत्यक्ष नथुरामचा सहभाग होता. विशेष म्हणजे सर्व हल्ल्यांच्या मुळाशी पुणेकर होते. असत्य गोष्ट वारंवार सांगितली की तिच खरी वाटू लागते. महात्मा गांधींच्या हत्येला ६७ वर्षे झाल्यानंतरही त्यांच्याबद्दल आजही खोटानाटा प्रचार सुरू आहे. महात्म्याला खलनायक ठरविण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. देशाच्या हितासाठीच गांधींची हत्या केली असून खुनी गोडसेचे उदात्तीकरण सुरू आहे. त्याला देशभक्त ठरवून हिरो बनविणे सुरू आहे. मात्र सत्य वेगळेच आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू आणि महात्मा गांधी फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त तुषार गांधी यांनी केले.सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालय, आम्ही सारे फाऊंडेशन, जिल्हा सर्वोदय मंडळ आणि शेतकरी संघर्ष समिती यवतमाळद्वारा आयोजित ‘गांधी समजून घेताना’ या विषयावर ते सोमवारी येथील नगरभवनात बोलत होते. विचारपिठावर नगराध्यक्ष कांचन चौधरी, प्रा.डॉ. रमाकांत कोलते, डॉ. विजय कावलकर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे उपस्थित होते.तुषार गांधी पुढे म्हणाले, महात्मा गांधींमुळे देशाची फाळणी झाली. त्यांनीच पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्यास बाध्य केले. ते मुस्लीमांचे धार्जीणे होते, त्यांनी भगतसिंगाला फाशीपासून वाचविले नाही. सुभाषचंद्रबाबूंचा काँग्रेसमधून काटा त्यांनीच काढला. ते दलितविरोधी होते, अशी अनेक कारणे सांगून त्यांची हत्या समर्थनीय ठरविण्याचा अट्टहास आजही सुरू आहे. गांधी फक्त गोडसे, आपटेंना नकोसे झाले होते असे नाही तर त्यामागे अनेकांचे हितसंबंध होते. खरे म्हणजे कपूर कमिशनने हत्येसंबंधीचे सर्व पुरावे जगासमोर मांडले आहे. तरीही खोटा प्रचार करून कपूर कमिशनला खोटे ठरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. २०१४ साली गांधींच्या हत्येसंबंधीची २० हजार कागदपत्र निरूपयोगी ठरवून जाळण्यात आली. ती कागदपत्रे जाळण्यापूर्वी मी वाचलेली आहेत, त्या पुराव्याच्या आधारे ‘लेट्स किल गांधी’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.एखाद्या कुटुंबाची वाटणी होते तेव्हा सर्व साहित्याचे वाटप होते. त्याचप्रमाणे देशाच्या फाळणीच्यावेळी प्रत्येक गोष्टीची वाटणी करण्यात आली, आणि त्यात वावगे असे काही नव्हतेच. देशाच्या कामकाजासाठी सर्वप्रथम पाकिस्तानला २० करोड देण्यात आले. त्यानंतर ५५ करोड देण्यात आले, असे एकूण ७५ करोड रुपये देण्यात आले असून दोन स्वतंत्र देशातील करारानुसारच हे ठरले होते.गांधी हत्येनंतर नथुरामने कोर्टात जे बयाण दिले त्यातील आवाज जरी नथुरामचा असला तरी लेखणी सावरकरांची असावी, असा दाट संशय आहे. नथुराम आणि कंपनीने गांधी हत्येपूर्वी सावरकरांचा आशीर्वाद घेतला आहे, हे सगळे कपूर कमिशनने नोंदविले आहे. गांधीजींवर तीन नाही तर एकूण सहा गोळ्या चालविल्या होत्या, हेसुद्धा नंतर निष्पन्न झाले आहे, असे तुषार गांधी म्हणाले.कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी गांधीजींचे आवडते भजन ‘वैष्णव जन तो तेने कहिये’ हे डॉ. कमल राठोड यांनी सादर केले. ‘गांधी-१५०’ या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाची रूपरेखा आणि परिचय अविनाश दुधे यांनी करून दिला. संचालन आणि आभार प्रा. घनश्याम दरणे यांनी मानले.गांधी हत्येचे सत्य मांडण्याचा प्रयत्नज्या विचारधारेने गांधीजींची हत्या केली. त्यांना हत्येनंतर वर्णीय आणि धार्मिक समाजव्यवस्था निर्माण करायची होती. त्यांचे हे षडयंत्र यशस्वी झाले नाही. गांधींची हत्या करूनही त्यांचे विचार ते नष्ट करू शकले नाही. म्हणूनच खोटा विषारी प्रचार त्यांनी सुरू केला आहे. आजही हीच विचारधारा कार्यरत असल्याने गांधी हत्येचे सत्य लोकांपुढे मांडण्याचा माझा प्रयत्न आहे, असे तुषार गांधी म्हणाले.
गांधींना खलनायक, गोडसेला नायक ठरविण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 9:34 PM
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करण्यात नथुराम गोडसे, नारायण आपटे यशस्वी झाले असले तरी त्यापूर्वी त्यांनी गांधीजींना मारण्यासाठी सहावेळा हल्ले केले होते. यापैकी चार हल्ल्यात प्रत्यक्ष नथुरामचा सहभाग होता. विशेष म्हणजे सर्व हल्ल्यांच्या मुळाशी पुणेकर होते.
ठळक मुद्देमहात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींचे प्रतिपादन : ‘गांधी समजून घेताना’ कार्यक्रमाला यवतमाळकर रसिकांची गर्दी