उदय पुंडे
ढाणकी : सर्रर्रर्रर्र करत चालणारा भाता, त्यातून निघणारी आग, घणावर पडणारे घाव आणि कणखर लोखंडाला आकार देणारे घिसडी बांधवांचे हात. हे चित्र ग्रामीण भागात पूर्वी सर्रास पाहावयास मिळत होते. आज हे चित्र दुर्मीळ झाले. मात्र, अद्यापही हा समाज उपेक्षितच आहे. त्यांच्या मुलांची शिक्षणाअभावी आबाळ होत आहे.
मृग नक्षत्र लागले की शेती कामाला वेग येतो. यावेळी या समाजाची आवर्जून आठवण होते. मृगात शेती कामासाठी लागणारे साहित्य जुळवाजुळवीसाठी शेतकरी धावपळ करतात. कुऱ्हाडी, विळे, खोरे यांना धार लावण्यासाठी ग्रामीण भागात घिसडी बांधवांकडे जाऊन काम केले जाते. पोलादी लोखंडाला आकार देऊन आपल्या घणाच्या साहाय्याने वेगवेगळे शेतीविषयक औजारे बनविणे आणि विकणे, हा या समाजाचा पारंपरिक व्यवसाय. या कामातून जे काही अल्प मिळकत मिळते, त्यातून हा समाज आपली गुजराण करतो.
आता देश महासत्ता होणार असल्याच्या बाता मारल्या जतात. मात्र, या समाजाकडे पाहिले की आपला देश अजूनही मागे असल्याची जाण होते. देशाने खूप प्रगती केली. मात्र, हा समाज उपेक्षितच राहिला. आजही हा समाज समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. अतिशय गरिबीत जगत आहे. रस्त्याच्या कडेला झोपडी टाकून आपला पोटापाण्याचा उद्याेग करायचा आणि दोन वेळ पोट भरायचे, हेच त्यांचे काम. या समाजात शिक्षणाचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. शिकून काही पोट भरणार नाही, अशी समाजाची धारणा आहे. त्यामुळे लेकरू कळत झालं की भाता फिरवण्याचा काम करायला लागतं. शाळेचा त्याचा संबंधच येत नाही. समाजातील तरुणांनासुद्धा आपला पारंपरिक व्यवसाय करीत गरिबीच जगणं जगावं लागत. विशेष म्हणजे, किती सरकार आले आणि गेले. मात्र, या समाजाचा गरिबीचा शाप अजून सुटला नाही.
बॉक्स
भटकंती अद्याप संपलीच नाही
वारंवार या गावातून त्या गावात आपलं बिऱ्हाड घेऊन भटकंती करीत राहिल्याने समाजातील बहुतांश लोकांकडे मतदान कार्ड, आधार कार्डसुद्धा नाही. त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. कोरोना महामारीतसुद्धा आधार कार्ड नसल्याने लस मिळत नाही, याहून मोठी शोकांतिका काय असणार. मतदार यादीत नाव नसल्याने लोकप्रतिनिधीसुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष कतात. इतरही बरेचसे समाज आजसुद्धा अतिशय गरिबीत जीवन जगत आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे.
070721\img_20210702_143922.jpg
आजही उपेक्षितच राहिला घीसडी समाज.