यवतमाळ : पती व सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या विवाहितांच्या छळाला विविध कारणे असली तरी पाठोपाठ मुलीच होणे, चारित्र्यावर संशय, दारूचे व्यसन आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी लावला जाणारा तगादा ही सर्वाधिक आहे. अशा गुन्ह्यांमध्ये कित्येकदा पतीसोबतच कुटुंबातील इतरांचाही नामोल्लेख केला जातो. प्रत्यक्ष छळाशी केवळ पतीचा संबंध असताना इतरांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागते.जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कौटुंबिक कलहाच्या अशा प्रकरणांमध्ये समूपदेशन करण्यासाठी पोलिसांमार्फत स्वतंत्र केंद्र चालविले जाते. सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती डी.एच. ब्राम्हणे या केंद्राच्या प्रमुख आहेत. या समूपदेशन केंद्रातील यंत्रणेशी चर्चा केली असता काही गंभीरबाबी पुढे आल्या. शहरी भागात मात्र वेगळे चित्र आहे. विभक्त कुुटुंब, चारित्र्यावर संशय, दारूचे व्यसन, त्यातून होणारी मारहाण, सतत मुलीच जन्माला घालणे, सतत फोनवर बोलणे, माहेरच्यांशी वाढता संपर्क, माहेरच्या मंडळींचा अवाजवी हस्तक्षेप, पैशाची चणचण आदी कारणे पुढे आली आहेत. या कारणांमुळे पती-पत्नींमध्ये खटके उडणे, मारहाण, माहेरी निघून जाणे, नातेवाईकांकडून नातेसंबंधांचा कोणताही विचार न करता पोलिसातील तक्रारीसाठी अथवा थेट न्यायालयीन खटल्यासाठी प्रोत्साहित करणे हे प्रकार घडत आहे. माहेरच्यांच्या पाठबळामुळे आणि आर्थिक संपन्नतेमुळे अनेकदा मुली इच्छा नसूनही (केवळ आई म्हणते म्हणून) पती व सासरच्या विरोधात पोलिसात तक्रारी दाखल करीत असल्याचे आढळून आले. संसार तुटू नये म्हणून पोलीस नरमाईची भूमिका घेतात, दोनही पक्षाला समजाविण्याचा प्रयत्न करतात. परंतु अनेकदा पोलिसांवरच ‘आरोपीला मॅनेज झाले’ असा आरोप करून त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या जातात. समूपदेशन केंद्रात गेल्यानंतर मात्र अनेक प्रकरणात तडजोड होते, त्यांची चूक त्यांना कळते. कित्येकदा तर पती-पत्नीचा वादच नसतो. त्यांच्या नातेवाईकांनी दोघांचेही कान भरुन तो उभा केला असल्याचे जाणवते. अशा प्रकरणात पोलिसांच्या समूपदेशन केंद्राकडून पती-पत्नीला, एवढेच नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांनाही योग्य मार्गदर्शन केले जाते. पोलीस ठाण्यापर्यंत गेलेली कौटुंबिक छळाची कित्येक प्रकरणे समूपदेशनाने मिटली आहेत. त्यांचे संसार तुटण्यापासून वाचले, आजही ते गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र काही प्रकरणात पती-पत्नीकडून ताठर भूमिका घेतली जात असल्याने गुन्हे दाखल केले जातात. त्यातूनच हा आकडा वर्षाकाठी ४०० च्या घरात पोहोचतो. अनेक विवाहितांना पतीकडून ‘जीवाची हमी’ हवी असते, त्यासाठी स्टॅम्प पेपरवर करार हवा असतो. मात्र पती लेखी करारात फसण्यास तयार नसतो. त्यातून प्रकरण पोलिसात दाखल होते. दाखल गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण कमी आहे. कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झालेले अनेक कुटुंब बर्बाद झाल्याचीही उदाहरणे आहेत. अशा घरात पुन्हा मुलगी देताना विचार केला जातो. कुटुंब निर्दोष सुटले तरी त्यांची सामाजिक हानी मोठ्या प्रमाणात होते. प्रकरण निर्दोष सुटल्यानंतर ‘४९८ (अ) कलमाचा गैरवापर झाला’ याची चर्चा होते. पती वगळता अन्य आरोपींचा छळाच्या या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसल्याचे सिद्ध होते. ते निर्दोषही होतात. मात्र खटल्याचा काळ त्यांच्या कायम स्मरणात राहतो. (जिल्हा प्रतिनिधी)
विवाहितांच्या छळामागे मुलीचा जन्म, चारित्र्य आणि व्यसनी पती
By admin | Published: July 05, 2014 1:38 AM