- संतोष कुंडकर
वणी (यवतमाळ) : तरुणपणात माणसात रग असते, ताकद असते. अशावेळी तारूण्यातील एकाकीपणाचे पान अलगद आणि सहज उलटविता येते. परंतु पत्नीची खरी गरज असते ती आयुष्याच्या सायंकाळीच. कारण वृद्धापकाळात सहचारिणीकडून मिळणारा मानसिक आधारच जगण्यासाठी प्रेरणा सदैैव देत राहतो. वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर असलेल्या व सहा महिन्यांपूर्वी पत्नीचे निधन झाल्यानंतर एकाकी झालेल्या फिरोज नजर खॉ पठाण यांच्याही अंधारलेल्या आयुष्यात उजेड पेरण्यासाठी त्यांच्या चार मुलींनी पुढाकार घेतला आणि या मुलींनी रविवारी सायंकाळी एका विधवा महिलेशी आपल्या ‘अब्बाजान’ चा ‘निकाह’ लावून देऊन समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला.
फिरोज नजर खॉं पठाण (५५) हे वणी तालुक्यातील घोन्सा येथील रहिवासी आहेत. त्यांना यास्मिन अजीज पठाण, शमा फारूख शेख, शाहिन शाकीर शेख व परवीन इरफान खान या चार विवाहित मुली आहेत. फिरोज नजर खॉं पठाण हे त्यांची दिवंगत पत्नी सुलताना यांच्यासह घोन्सा येथे वास्तव्याला होते. मात्र २७ एप्रिलला सुलताना यांचे हृदयविकाराने निधन झाले आणि फिरोज यांच्या आयुष्याला रितेपण आले. पत्नीच्या निधनानंतर ते त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी शमा फारूख शेख यांच्या घरी राहत होते.
वडिलांचे एकाकीपण सर्वांनाच अस्वस्थ करणारे होते. त्यामुळे चारही मुली व जावयांनी एकत्र येऊन वडिलांना कुणाचा तरी आधार मिळावा, यासाठी त्यांचा पुन्हा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. फिरोज यांनी मात्र याला विरोध केला. मात्र नंतर तेही विवाहासाठी तयार झालेत. अशातच फिरोज यांची तिसऱ्या क्रमांकाची मुलगी शाहिन हिच्या परिचयातील परवीन मजीद शेख या विधवा महिलेपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. परवीन त्यांच्या आईकडे राहतात. त्यांना वडिल नाहीत. त्यांच्या सर्व बहिणींचे लग्न झाले आहे. त्यांनीही हा प्रस्ताव मान्य केला आणि अखेर विवाहाची तारिख ठरली. रविवारी १८ आक्टोबरला सायंकाळी ५ वाजता परवीन यांच्या घरी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे हा अनोखा विवाह लावून देण्यात आला. यावेळी दोन्ही कुटुंबातील मोजके लोक उपस्थित होते. या विवाहाने समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला आहे.