लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हास्तर पाठोपाठ विभागीय स्तरावर सामना खेळण्यासाठी प्रतिस्पर्धी संघच नसल्याने राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळच्या मुलींचा संघ एकही सामना न खेळता थेट राज्यस्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धेसाठी पात्र ठरला. मुलांच्या गटात अमरावती संघाने बुलडाणा संघाचा ६ विरूद्ध ० गोलने दणदणीत पराभव करीत राज्यस्तरीय स्पर्धेत दिमाखात प्रवेश केला.क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय यवतमाळच्यावतीने येथील पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर अमरावती विभागीय नेहरू कप हॉकी स्पर्धा घेण्यात आल्या. १७ वर्षे गटात मुलांच्या गटात अकोला, यवतमाळ, बुलडाणा, अमरावती असे चार संघ, तर मुलींच्या गटात केवळ यवतमाळ हा एकमेव संघ सहभागी झाला होता.राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी या खेळासाठी अमरावती विभागात मुलींचा केवळ एक संघ कसाबसा तयार झाल्याची शोकांतिका विभागीय स्पर्धेत अनुभवायला मिळाली. यवतमाळच्या संघाला जिल्हा व विभागीयस्तरावर प्रतिस्पर्धी संघ न मिळाल्याने या संघाला राज्यस्तरावर चाल देण्यात आली.मुलांच्या गटात अंतिम फेरीत अमरावती संघाने कमकुवत बुलडाणा संघाचा तब्बल ६ विरूद्ध ० गोलने दणदणीत पराभव करून विभागीय स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. मध्यंतरापर्यंत अमरावती संघ तीन गोलने आघाडीवर होता. मोहम्मद अरबाज, आवेद अलमास, मोहम्मद आतिक यांनी हे गोल केले. मध्यंतरानंतर गोल करण्याची लय कायम ठेवत अबुल बेग, एस.के. अरबाज व अतिरिक्त खेळाडू उमर यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलच्या बळावर आणखी तीन गोल चढवित बुलडाणा संघावर ६ विरूद्ध ० गोलने विजय साजरा केला.राज्यस्तर स्पर्धेसाठी पात्र ठरलेले संघ २० सप्टेंबरपासून पुणे येथे होणाºया स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेत पंच म्हणून विदर्भ हॉकी संघटनेचे सहसचिव प्रमोद जैन व पंकज वाघधरे यांनी काम पाहिले. स्पर्धा संयोजक म्हणून क्रीडा कार्यालयाचे क्रीडाधिकारी राहुल तपाळकर, अभय धोबे यांनी जबाबदारी सांभाळली.
एकही सामना न खेळता मुलींचा संघ राज्यस्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 1:01 AM
जिल्हास्तर पाठोपाठ विभागीय स्तरावर सामना खेळण्यासाठी प्रतिस्पर्धी संघच नसल्याने राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळच्या मुलींचा संघ एकही सामना न खेळता थेट राज्यस्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धेसाठी पात्र ठरला.
ठळक मुद्देनेहरू कप हॉकी : मुलांच्या गटात अमरावती संघाचा विजय