शेतकऱ्यांचा टाहो : कर्ज वितरणासाठी बँकांकडे पैसाच नाही रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : आर्थिक विवंचनेला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतमालाचे दर दररोज कोसळत आहे. तूर विक्रीचेही वांदे आहे. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी नवनवीन आदेश काढत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा सवाल करीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, तुरीचे चुकारे द्या, असा टाहो जिल्ह्यातील तमाम शेतकरी फोडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची आज गरज निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री बाभूळगाव दौऱ्यात काय घोषणा करतात, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. गत काही वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहे. असा एकही दिवस जात नाही की शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. यावर्षी तुरीचे प्रचंड उत्पादन झाले. कर्जाचा डोंगर कमी होईल, अशी आशा होती. परंतु धडाधड तुरीचे दर खाली आले. नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कुचंबना झाली. १५-१५ दिवस शेतकऱ्यांना या ठिकाणी मुक्काम ठोकावा लागला. हे शुक्लकाष्ठ संपत नाही तोच सातबारावरील नोंदीपेक्षा अधिक तूर विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी हा आदेश असला तरी यात शेतकरीच बळी ठरणार आहे. शेतकऱ्यांचे तुरीचे चुकारे रखडले आहे. थकबाकीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करण्याची नोटीस बँकांनी काढली. त्यातून संपूर्ण कर्जमाफीची मागणी पुढे आली. जिल्ह्यातील तब्बल एक लाख ३९ हजार शेतकरी ब्लॅक लिस्टमध्ये आहे. त्यांना ९५० कोटींच्या कर्जाची परतफेड करता आली नाही. यात ५९६ कोटींचे कृषी कर्ज आहे. खरीपात शेतकऱ्यांना १९१२ कोटींचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे. मात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँकांकडे पैसेच नाही. दुसरीकडे सोयाबीन उत्पादकांनाही २०० रुपयाप्रमाणे २० क्विंटलपर्यंत अनुदान दिले नाही. २०१५ साली घोषित दुष्काळ निधीही शेतकऱ्यांना मिळाला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरणी कशी करावी, असा प्रश्न आहे. दुसरीकडे वीज भारनियमनाने ओलिताला ब्रेक लागला आहे. केवळ २४ तासात आठ तासच वीज पुरवठा शेतीला होत आहे. मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे ते लक्ष देतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मुख्यमंत्री आज चार तास बाभूळगावात जिल्ह्यातील जलयुक्त शिवार, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत मिशनच्या कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी ६ मे रोजी बाभूळगाव तालुक्यात येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील बैठक आटोपून दुपारी २ वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने बाभूळगावात येतील. २.१५ वाजता ते सरुळ येथे पोहोचणार आहेत. तेथे जलयुक्त शिवार, सिमेंट नाला खोलीकरण, गाळ काढणे, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत मिशन आदी कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजता बाभूळगाव पंचायत समिती सभागृहात मुख्यमंत्री जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहेत. सायंकाळी नागपूरकडे रवाना होतील.
मुख्यमंत्री साहेब, कर्जमाफी आणि तुरीचे चुकारे द्या हो !
By admin | Published: May 06, 2017 12:10 AM