ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी : पंचायतराज समिती प्रमुखांचे पत्र
कळंब : विदर्भातील अष्टविनायकांमध्ये येथील चिंतामणी मंदिराचा समावेश होतो. त्यामुळे भाविकांची दर्शनासाठी नेहमीच मोठी गर्दी होते. त्यामुळे या मंदिराला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन विकासकामांना चालना द्यावी, अशी मागणी पंचायतराज समितीचे अध्यक्ष संजय रायमुलकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.
पंचायतराज समिती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आमदार संजय रायमुलकर यांनी चिंतामणी मंदिराला भेट दिली. त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून मंदिराचे महत्त्व, माहात्म्याची माहिती घेतली. इतके पुरातन व पावन मंदिर असताना या मंदिराला 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यामुळे शासकीय पातळीवरून विकासासाठी आवश्यक निधी मिळत नाही. एवढेच नाही तर, भाविकांना सुविधा देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी माहिती मुंबई बाजार समितीचे संचालक प्रवीण देशमुख व चिंतामणी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे यांनी दिली होती.
त्यावेळी आमदार संजय रायमुलकर यांनी या मंदिराला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी पत्रव्यवहार सुरू केला आहे. येणाऱ्या काळात या मंदिराला 'ब' वर्ग मिळाल्यास विकासासाठी मोठा निधी मिळण्याची शक्यता आहे. सोबतच कळंबच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.