लोकमत न्यूज नेटवर्कघारफळ (बाभूळगाव) : प्रकल्पांच्या कामांसाठी, पुल बांधणीसाठी मी केंद्रातून निधी देत आहे. मात्र स्थानिक आमदारांनी या कामांवर लक्ष ठेवले पाहिजे. पुल बांधत असताना तो पुल कम बंधारा होईल का, याचाही विचार करा. रस्ते बांधताना शेतातील माती दिल्यास, शेतकºयाला मोफत शेततळे बांधून देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.घारफळ (ता. बाभूळगाव) येथे केंद्र पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, शेतकºयांच्या आत्महत्यांची कारणे आम्ही शोधली आहेत. आता त्यावर उपाय केले जात आहे. ड्रीपद्वारे सिंचन केल्यास उत्पन्न अडीच पट वाढू शकते. शेतमालास योग्य किंमत मिळाली, प्रक्रिया उद्योग सुरू झाले आणि ग्रामीण तरुणांच्या हाताला काम मिळाले तर शेतकरी आत्महत्या होणारच नाही. आता जिल्ह्यातील अर्धवट राहिलेल्या १५ प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यासाठी ७३८ कोटींचा निधी केंद्राने दिला आहे. तो खर्च करून वर्षभरात ही सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत. मी २५ नोव्हेंबर २०१५ रोजी यवतमाळात आलो होतो, त्यावेळी रस्त्यांच्या कामांसाठी ३ हजार कोटींचे पॅकेज घोषित केले होते. आज या जिल्ह्यात जवळपास ६ हजार ३५ कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरू आहेत, असे गडकरी यांनी सांगितले. या कामांची यादीच त्यांनी वाचून दाखविली. शेतात, घरात, कार्यालयात वापरले जाणारे पाणी त्याच ठिकाणी मुरविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.रस्ता बांधताना माती लागते. शेतकºयाने आपल्या शेतातील माती अशा रस्त्यासाठी दिल्यास सरकार त्याला मोफत शेततळे बांधून देईल, अशी घोषणाही त्यांनी केली. बनावट बियाण्यांच्या धोका आणि बदलते तंत्रज्ञान लक्षात घेता शेतकºयांना यापुढे सेंद्रीय शेतीवरच भर द्यावा, असे आवाहनही नितीन गडकरी यांनी केले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार दिलीप झाडे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोकराव घारफळकर, निलय नाईक, समाज कल्याण सभापती प्रज्ञा भूमकाळे, पंचायत समिती सभापती गौतम लांडगे, उपसभापती हेमंत ठाकरे, मनोहर बुरेवार, प्रकाश भूमकाळे, सचिन महल्ले, ओम राठी, यासह परिसरातील विविध गावांचे सरपंच, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्त्यासाठी माती द्या, मोफत शेततळे देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 10:06 PM
प्रकल्पांच्या कामांसाठी, पुल बांधणीसाठी मी केंद्रातून निधी देत आहे. मात्र स्थानिक आमदारांनी या कामांवर लक्ष ठेवले पाहिजे. पुल बांधत असताना तो पुल कम बंधारा होईल का, याचाही विचार करा.
ठळक मुद्देनितीन गडकरी : पुलासोबतच बंधारा बांधण्यासाठी स्थानिक आमदारांना सूचना