रूपेश उत्तरवार
यवतमाळ : यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जागतिक पातळीवर साजरे केले जात आहे. मात्र, जगभरात तृणधान्याचा तुटवडा आहे. दुसरीकडे राज्यात तृणधान्याचे उत्पादन भुईसपाट झाले आहे. याला पुनरुज्जीवित करण्यासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्यातील आठ लाख शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर किट दिली जाणार आहे. त्याचे नियोजन कृषी विभागाने हाती घेतले आहे.
धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे आराेग्य उत्तम राखण्यासाठी तृणधान्य हे पौष्टिक धान्य म्हणून ऊर्जा प्रदान करते. यात ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा आणि कोदो या धान्याचा समावेश आहे. यामुळे जगभरात या धान्याची मागणी वाढली आहे. तृणधान्याची मागणी वाढत असताना उत्पादन मात्र शून्य होण्याच्या वाटेवर आहे. शेतकरी अशा धान्याची लागवडच करीत नाही. बाजारात या धान्याला मागणी असतानाही याचे उत्पादन होत नाही, ही बाब लक्षात घेता, कृषी विभागाने याच्या मिनी किट तयार केल्या आहेत. त्या १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.
यात खरीप ज्वारीचे बियाणे २०० ग्रॅम, बाजरी १०० ग्रॅम, राजगिरा १०० ग्रॅम, राळा २०० ग्रॅम आणि कोदो २०० ग्रॅम बियाणे दिले जाणार आहे. यातून उत्पादित धान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबाला वापरता येणार आहे. याशिवाय यातून बियाणे तयार करून पुढील दोन वर्षे शेतकऱ्यांना त्याचा वापर करता येणार आहे. यामुळे तृणधान्याचे बियाणे घरीच तयार करता येणार आहे. अशा आठ लाख किट राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.
यवतमाळ जिल्ह्याला तृणधान्याच्या दोन लाख किट दिल्या जाणार आहेत. यातून तृणधान्याची लागवड वाढेल. याच्या उत्पादकतेत भर पडण्यास मदत होणार आहे.
अशोक ठाकरे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, यवतमाळ.