दिग्रस : येथील बा.बू. कला महाविद्यालयाच्या पदव्युत्तर मराठी भाषा व साहित्य विभागाची एम.ए. मराठीची विद्यार्थिनी गीता भाऊराव गावंडे ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत सातवी मेरीट आली. तिचा महाविद्यालयातर्फे गौरव करण्यात आला.
महागाव येथील कृषिकन्या गीता गावंडे हिने ८१ टक्के गुण प्राप्त केले. महाविद्यालयाचा पदव्युत्तर मराठी विभाग २००३ पासून उत्कृष्ट निकालाची परंपरा जोपासत आहे. यापूर्वीही अनेक विद्यार्थी उच्च, प्रथम व 'बी प्लस’मध्ये उत्तीर्ण झाले. यापूर्वी स्वाती नवरे ही विद्यार्थिनी २००५-०६ मध्ये एम.ए. मराठी विषयात विद्यापीठात सातवी मेरीट आली होती.
गीता गावंडे ही पदव्युत्तर मराठी भाषा व साहित्य विभागाची विद्यार्थिनी आहे. तिने महाविद्यालय व मराठी विभागाची यशाची परंपरा कायम ठेवला. शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष विजय बंग, सचिव श्याम पाटील, डॉ. अभय पाटील, प्राचार्य व्ही.एल. खळतकर यांनी गीताचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. इतर विद्यार्थी गीताच्या यशापासून प्रेरणा घेऊन आपले ध्येय प्राप्त करतील, असा विश्वास प्रा.डॉ. रूपेश कऱ्हाडे यांनी व्यक्त केला.