पुसद : येथे एका कोविड सेंटरमधील सेवार्थी कोविडयोद्धांचा सन्मान करण्यात आला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारती मैंद पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत येथील एका मंगल कार्यालयात कोविड सेंटर उभारण्यात आले. रुग्णांची सेवा करणाऱ्या तब्बल ६० सेवार्थींचा कोरोनायोद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात भारती मैंद सर्जिकल बँकेचे उद्घाटन करण्यात आले.
पुसद अर्बन बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी केले. त्यांनी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमातून झालेली कामे, सर्व सोयीयुक्त कोविड सेंटर उभारणीची पार्श्वभूमी सांगून वैद्यकीय अधिकारी ते सफाई कर्मचाऱ्यांच्या नि:स्वार्थ सेवेमुळेच तब्बल ९८ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेल्याचे सांगितले. भारती मैंद सर्जिकल बँकेतील साहित्य गरजूंना वापरासाठी मोफत मिळणार असल्याचे शरद मैंद यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी शरद मैंद यांनी कोरोनाकाळात दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उद्घाटक एसडीपीओ अनुराग जैन यांनी सर्व सोयीयुक्त कोविड सेंटरची उपयुक्तता वेळोवेळी सिद्ध झाल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी असलेले महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी लीगल सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲड. आशिष देशमुख यांनी लोकप्रतिनिधींनी करावयाची कामे शरद मैंद करीत असल्याचे सांगितले. यावेळी सत्कारमूर्तींतर्फे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार, तर बऱ्या झालेल्या रुग्णांच्या वतीने स्टेट बँकेचे अधिकारी तानाजी एगुलवाड, दिनेश जाधव, विकास माने यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार अशोक गीते, डॉ. दीपक पोले, डॉ. दिनेश चव्हाण, कोविड सेंटरचे व्यवस्थापकीय समिती सदस्य सुरज डुबेवार, कौस्तुभ धुमाळे, महेश बजाज, अमोल व्हडगिरे उपस्थित होते. संचालन मनीष अनंतवार, तर आभार व्यवस्थापन समिती सदस्य ललित सेता यांनी मानले.