यवतमाळ : येथील पोस्टल मैदानावर सुरू असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत उप-उपांत्य फेरीतील रंगतदार सामन्यात बलाढ्य चर्चिल ब्रदर्स गोवा, डायस एलेव्हन मुंबई, एसआरपीएफ नागपूर व न्यू ग्लोब कामठीने उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रेण्ड्स फुटबॉल असोसिएशनच्यावतीने रमेश यादव, संजय देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात उप-उपांत्य फेरीतील पहिला सामना सीएफए तेलंगाणा विरुद्ध न्यू ग्लोब कामठी संघात झाला. निर्धारित वेळेत दोनही संघ ०-० गोलने बरोबरीत होते. सामन्याचा निकाल टाय ब्रेकरने करण्यात आला. यात कामठी संघाच्या खेळाडूंनी बाजी मारली व संघाला ४-३ अशा गोल फरकाने रोमहर्षक विजय प्राप्त करून दिला. मनिष बैस, एतेशाम रहीम, हबीब अहमद, मोहम्मद जावेद यांनी विजयी गोल केले. दुसरा सामना एसआरपीएफ नागपूर विरुद्ध फे्रण्ड्स क्लब ज्युनिअर यवतमाळ संघात रंगला. सामन्याच्या ३५ व्या मिनिटात नागपूरच्या राहुल मुंड्री याने गोल करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. यवतमाळच्या खेळाडूंनी गोल करण्यासाठी खूप घाम गाळला. मात्र त्यांना शेवटी १-० गोलने सामना गमवावा लागला.दुसऱ्या सत्रात डायस एलेव्हन मुंबई विरुद्ध एकता फुटबॉल अकॅडमी भोपाल संघात संघर्षपूर्ण सामना झाला. सामन्याच्या पहिल्याच मिनिटात मुंबईच्या डायस या खेळाडूने अफलातून गोल केला तर काही क्षणात दुसऱ्याच मिनिटात ओला या नायजेरियन खेळाडूने गोल करून मुंबई संघाला २-० गोलची आघाडी मिळवून दिली. दोन मिनिटात दोन गोल झाल्याने भोपाळ संघ दबावात आला. या दबावातून सावरायला वेळ न देता मुंबईच्या प्रणीतने आठव्या मिनिटात उत्कृष्ट पासच्या बळावर तिसरा गोल करून संघाचा विजय निश्चित केला. या विजयात ओला या खेळाडूने आणखी भर घालत २४ व्या मिनिटात वैयक्तिक दुसरा व संघासाठी चौथा गोल करीत मुंबई संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला.चौथ्या उपांत्यपूर्व फेरीत गोव्याच्या बलाढ्य चर्चिल ब्रदर्स ज्युनिअर संघाने फे्रण्ड्स यवतमाळ संघाचा २-० गोलने पराभव करून उपांत्य फेरीत सहज प्रवेश केला. लिएंडर डिसुजा याने चौथ्या मिनिटात तर फॅड्री याने ५५ व्या मिनिटात विजयी गोल केले. या स्पर्धेत रिचर्ड डिक्सन, फर्डिनांड आर, के.एस. तांबे, सिद्धेश श्रीवास्तव, मेहुल मंचरमानी यांनी पंच म्हणून काम पाहिले. (क्रीडा प्रतिनिधी)
गोवा, मुंबई, नागपूर, कामठी उपांत्य फेरीत
By admin | Published: February 28, 2015 2:02 AM