अकोलाबाजार : मुख्य कालवा शेतातून असूनही पिकांना सिंचन करण्यासाठी पाणी मिळत नव्हते. कामठवाडा शिवारातील शेतकरी अनेक वर्षांपासून पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्याची मागणी करीत होते. परंतु अकोलाबाजार शिवाराच्यापुढे पाणी चढत नसल्यामुळे शेतकरी आतापर्यंत रबी पिकापासून वंचित होते. शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेऊन तब्बल २६ वर्षानंतर पाटबंधारे विभागाकडून मुख्य कालव्याची दुरुस्ती करण्यात आली असून कामठवाडा, कुऱ्हाड शिवारापर्यंत ५९ किलोमीटरची लाईन टाकून प्रकल्पाचे पाणी सोडून नुकतीच चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे पुढील वर्षापासून शेतकऱ्यांना आपल्या शेतात रबी पिकांच्या सिंचनासाठी लाभ घेता येणार आहे.गोखी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याची लांबी ६४ किलोमीटर असून आतापर्यंत अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे कामठवाडापर्यंत पाणी पोहोचले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावले आहे. २०१६-१७ च्या रबी हंगामसाठी वितरिका, गेट व पाटसरी दुरुस्ती करून मुख्य कालव्याची ६४ किलोमीटरपर्यंत दुरुस्ती करण्याची मागणी आहे. आतापर्यंत ५१ किलोमीटरपर्यंत शेतकऱ्यांना रबीसाठी सुरळीत पाणी मिळत असून २०१६-१७ पासून खैरगाव, मांजर्डा व कामठवाडाच्या १४०० हेक्टरमध्ये शेतकऱ्यांना रबी हंगामात सिंचन करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले असून कामठवाडा येथे सरपंच, उपसरपंच, सदस्य व शेतकऱ्यांनी पाण्याचे पूजन केले. पाणी पोहचत असल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे. (वार्ताहर)
२६ वर्षांनंतर पोहोचले गोखी प्रकल्पाचे पाणी
By admin | Published: April 16, 2016 1:59 AM