पुसद : शहरात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रविवारी वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तीन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी लंपास केल्या. या घटनांमुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील बंजारा कॉलनी रोड, दवा बाजार रोड, वसंतनगर आदी भागात रविवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या ओढून घटनास्थळावरून पोबारा केला. या तिन्ही सोनसाखळ्या त्याच चोरट्यांनी लंपास केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ठाणेदार दिनेशचुंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. तिन्ही ठिकाणच्या फुटेजमध्ये एका दुचाकीवरून दोन तरुण सकाळच्यावेळी पोबारा करताना दिसत आहेत.
शहरात एकाच दिवशी सकाळीच वेगवेगळ्या तीन ठिकाणी चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्याने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान शहर व वसंतनगर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. दरम्यान, या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर भारस्कर, सहायक पोलीस निरीक्षक कैलास ससाणे, डीबीचे जमादार दिलीप जाधव यांनी सांगितले.
बॉक्स
पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह
शहरात तीन पोलीस ठाणे आहे. मात्र, भरदिवसा चोरटे धुमाकूळ घालून सोनसाखळ्या लंपास करीत आहे. चोरीच्या घटना सातत्याने घडत आहे. नुकताच वाशिम रोडवर खून झाला. या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत आहे. निर्माण झाली आहे. तसेच पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. पोलिसांचा वचक संपला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोट
रविवारी सोनसाखळी लांपास करण्याच्या तीन घटना घडल्या. त्यापैकी दोन शहर तर एक वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू आहे. चोरट्यांना लवकरच जेरबंद करू.
दिनेशचंद्र शुक्ला, ठाणेदार, शहर पोलीस ठाणे, पुसद