रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. ५० वर्षांपूर्वी कापसाला आणि सोन्याला सारखेच दर होते. मात्र, २०१९ मध्ये सोन्याचे भाव ३४ हजार २०० रुपये तोळ्यावर पोहोचले. तर वाढीव हमीदरानुसार कापूस ५५५० रुपये क्विंटलवरच थांबला. कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता खर्चावर आधारित भाव न दिल्याने कापूस उत्पादकांची निराशा झाली आहे. यातूनच राज्यातील कापसाचे लागवडक्षेत्रही निम्म्यावर घटले आहे.१९७२ मध्ये कापसाचा दर २५० ते २७५ रूपये क्विंटल होता. त्यावेळी सोन्याचा दर एका तोळ्याला १८४ रूपये होता. विशेष म्हणजे, कापसाकरिता एकाधिकार योजना त्यावेळी लागू करण्यात आली होती. यानंतरच्या काळात कापसाचे दर वाढले. सोबतच सोन्याचे दरही वाढत गेले. १९७५ पर्यंत कापूस आणि सोन्याचे दर एक तोळा आणि एका क्विंटलला सारखे राहिले. त्यावेळी कापूस ५४० रूपये क्विंटलपर्यंत होता.मात्र यानंतरच्या काळात कापूस आणि सोन्याच्या दरात तफावत वाढत गेली. १९८७ मध्ये पणन महासंघाचे कापसाचे हमीदर ५६० रूपये क्विंटल होते. सोन्याचे दर १३११ रूपये तोळ्यापर्यंत होते. १९९० मध्ये कापूस ७०० रूपये क्विंटलवर पोहचला आणि सोने ३३२० रूपये तोळ्याच्या घरात पोहचले.कापसाला दरवर्षी तुटपुंजी दरवाढ देण्यात आली. वर्षाकाठी ४० ते १०० रूपयापर्यंत वाढ झाली. २०१९ मध्ये कापसाचे दर ५५५० रूपये क्विंटलवर पोहचले. तर सोन्याचे दर एका तोळ्याला ३४ हजार २०० रूपयांवर पोहचले आहेत. यामध्ये २८ हजार ६५० रूपयांची तफावत आहे. ही तफावत पाहून शेतकरी सतत निराश होत आहे. त्यामुळे लागवडक्षेत्रही कमी केले आहे. पूर्वी राज्यात ९० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड होत होती. आता १ कोटी हेक्टरपैकी ५० वर्षात कापसाचे क्षेत्र ४० लाख हेक्टरपर्यंत खाली आले.
सोने गेले ३४ हजारांवर, कापूस अडला पाच हजारांवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:11 PM
कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. ५० वर्षांपूर्वी कापसाला आणि सोन्याला सारखेच दर होते. मात्र, २०१९ मध्ये सोन्याचे भाव ३४ हजार २०० रुपये तोळ्यावर पोहोचले. तर वाढीव हमीदरानुसार कापूस ५५५० रुपये क्विंटलवरच थांबला.
ठळक मुद्दे५० वर्षांतील विरोधाभास राज्यातील कापसाचे लागवडक्षेत्रही निम्म्यावर आले