फुलसावंगी : कोरोनाजन्य परिस्थितीत शासनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या येथील एका ज्वेलर्सला महसूल आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त पथकाने तब्बल ५० हजारांचा दंड ठोठावला. ही महागाव तालुक्यातील पहिली कार्यवाही असून अनावश्यक दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
अत्यावश्यक दुकाने वगळता महागाव तालुक्यातील व्यावसायिक दुकाने उघडत असल्याची बाब महसूल, आरोग्य, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी महसूल, पोलीस, स्थानिक प्रशासनाला धारेवर धरले. अशातच फुलसावंगी येथील वर्मा ज्वेलर्स हे दुकान उघडल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. अधिक चौकशी केली असता दुकान उघडल्याचे प्रशासनाला आढळून आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तब्बल ५० हजाराचा दंड ठोठावला. ही कार्यवाही तहसीलदार नामदेव इसळकर यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार डॉ. संतोष अदमुलवाड यांच्या पथकाने केली. तलाठी आय. जी. चव्हाण, जमादार सुभाष हगवणे, एस. एम. पवार, शिवप्रसाद डोंगरे, शेख जानी, सुदर्शन खंदारे उपस्थित होते.