अविनाश साबापुरे, यवतमाळ : गुणवत्तेवर कुणाची मक्तेदारी थोडीच असते? संधी मिळाली तर गरीबही शेवटच्या चेंडूवर सिक्सर हाणू शकतो. होय, वावरात काबाडकष्ट उपसत म्हातारपण आलेल्या आजींनीही यंदा परीक्षा दिली अन् नुसती परीक्षाच दिली नाहीतर चक्क ९८ टक्के गुण मिळवत जिल्ह्यात अव्वल नंबरही पटकावला आहे.
काय म्हणता हे खरे नाही? तर वाचा आता सविस्तर.... हातात कधीही पाटीपुस्तक न धरलेल्या, कधीही शाळेत न गेलेल्या पण आता उतारवयात शिक्षणाची संधी मिळताच संधीचे सोने करणाऱ्या या आजी एकट्याच नाहीत बरं का! त्या आहेत दोघी. एकीचे नाव आहे मिरा मोतिराम पेंदोर. तिचे वय आहे ५५ वर्षे. अन् दुसरीचे नाव आहे सुशिला पुंजाराम ढोक. तिचे वय आहे ६५ वर्षे. अन् दोघींनीही गुण मिळविलेत ९८ टक्के !
दहावी-बारावीच्या परीक्षेत शिकवणी लावून मेरिट येणाऱ्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा नव्हे. तर प्रौढ असाक्षरांसाठी झालेल्या परीक्षेतील ‘टाॅप’ वयोवृद्ध विद्यार्थ्यांची ही यशोगाथा आहे. प्रौढ असाक्षरांना शिकवून १७ मार्च रोजी त्यांची १५० गुणांची परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळातर्फे जाहीर करण्यात आला. त्यात जिल्ह्यातील एकंदर १२ हजार ४५२ प्रौढांनी पेपर दिला. त्यातील ११ हजार २७१ प्रौढांनी बाजी मारली. पण त्यातल्या त्यात मिरा पेंदोर आणि सुशिला ढोक या दोन आजीबाईंनी चक्क ९८ टक्के गुण घेत शिक्षण यंत्रणेलाही चकीत करुन टाकले आहे. या वयात एका ठिकाणी स्थिर बसून बारीक अक्षरे पाहून वाचणे, लिहिणे तसे कठीणच असते. पण या आजींनी तब्बल दोन तासांचा पेपर एकाग्रचित्ताने सोडविला अन् गुणवत्तेचा षटकार मारला !
कोण आहेत या आजीबाई?यातील सुशिला पुंजाराम ढोक या ६५ वर्षांच्या आजी बाभूळगाव तालुक्यातील घारफळ गावच्या. तेथील जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावरुन त्यांनी परीक्षा दिली. वृद्ध पती, दोन मुले, एक मुलगी, नातू अशा गोतावळ्यात त्या रमलेल्या. घरच्या चार एकर वावरात याही वयात त्या राबतात. तर मिरा मोतिराम पेंदोर या ५५ वर्षांच्या आजी यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजार गावच्या. परिस्थिती बेताचीच. आयुष्यभर शिकण्याची संधीच मिळाली नाही. यंदा संधी येताच अकोलाबाजारच्या केके स्प्रिंगडेल शाळेच्या केंद्रावरुन त्यांनी पेपर दिला.
पटकावले पैकीच्या पैकी गुण ! १५० गुणांच्या परीक्षेत ५०-५० गुणांचे तीन पेपर होते. त्यात सुशिला ढोक यांनी एकंदर १४६ गुण मिळविले. वाचन आणि लेखन या दोन पेपरमध्ये ५० पैकी ५० गुण मिळविले. तर संख्याज्ञानात त्यांना ४६ गुण मिळाले. मिरा पेंदोर यांनीही १४७ गुणांची कमाई केली. त्यात लेखनाच्या पेपरमध्ये त्यांना पैकीच्या पैकी गुण आहेत. वाचनात ४९ आणि संख्याज्ञानाच्या पेपरमध्ये ४८ गुण मिळाले.
स्वत:हून केला अभ्यासघारफळच्या शाळेत सुशिला ढोक यांची असाक्षर परीक्षार्थी म्हणून नोंद झाली होती. त्यामुळे शिक्षक आणि नव भारत साक्षरता कार्यक्रमातील स्वयंसेवकांनी वेळोवेळी घरी येऊन सुशिला आजीला शिकविले. पण आजीला स्वत: शिक्षणाची ओढ लागल्याने त्यांनी स्वत:हून बराच अभ्यास केला. परीक्षा आहे असे कळल्यावर तर त्यांनी अभ्यास वाढविला, असे सुशिला ढोक यांच्या नातीने सांगितले.