यवतमाळ : शहरात भाईगीरीचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चहा नाशत्याचे बीलही कोणी मागू नये अशी या भाईंची धारणा आहे. सदैव गजबजलेल्या स्टेट बॅंक चौकातील भवानी स्वीट मार्ट येथे नास्ता घेण्यासाठी मोठी गर्दी असते. सोमवारी दुपारी पाच जण येथे नास्ता करण्यासाठी आले. नास्ता केल्यानंतर बिल मागितले असता आलेल्या भाईंचा संताप अनावर झाला. त्यांनी स्वीट मार्ट मालकासह तेथील नोकरांना दम देणे सुरू केले. या टोळक्याचा राडा पाहून परिसरातील नागरिकही धास्तावले होते.
शहर पोलिसांना स्टेट बॅंक चौकात राडा होत असल्याची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. तत्काळ या आरोपींना जागेवरच पकडून चोप दिला. त्यांची दहशत मोडण्यासाठी पोलिसांनी सर्वांसमोरच बाजीराव बाहेर काढला. नंतर या टोळक्याला शहर पोलिस ठाण्यात आणून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. व्यावसायिकाने मात्र भीतीतून तक्रार देण्याचे टाळले. याच कारणाने अशा गावगुंडांची हिंमत वाढत असल्याचेही सांगण्यात आले.
अल्पवयीन मुलगा उठला वडिलांच्या जीवावर
सेजल रेसिडेन्सी वीट भट्टी परिसरात राहणाऱ्या कुटुंबात मोठी घटना टळली. अल्पवयीन मुलगा चक्क धारदार चाकू घेऊन आपल्या वडिलांवरच चालून गेला. वडील कसेबसे त्याच्या तावडीतून बाहेर पडले. ते मुलाच्या भीतीने धावू लागले. हा प्रसंगी पाहून सुज्ञ नागरिकांनी याची माहिती शहर पोलिसांना दिली. पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्या चवताळलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडील शस्त्र जप्त केले. त्यालाही जागेवरच प्रसाद देत शांत बसण्याची तंबी दिली. पोलिसांना पाहून तो बालकही भानावर आला आणि घरात निघून गेला. या प्रकरणात विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याने पोलिसांना ठोस कारवाई करता आली नाही.