दिग्रस : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ कारवाई करावी, यासह विविध मागण्यांबाबत गोर सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात गुरुवारी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, नवी मुंबई विमानतळाला दिवंगत वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे संयुक्त पूर्व परीक्षेचे सर्व परीक्षेचे वेळापत्रक तत्काळ जाहीर करून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेल्या ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवावे, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
राज्य सरकारने तत्काळ कारवाई करून त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तहसीलदार राजेश वजीरे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पालत्या यांच्या आदेशावरून तालुकाध्यक्ष चंदन पवार व कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते.