लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : ग्रामीण भागात शिबिर आयोजित करून सर्व लहानथोरांची आरोग्य तपासणी केल्यानंतर औषधोपचार करण्यासाठी तसेच आरोग्याविषयी जनजागृती व्हावी, याकरिता तालुक्यात गोरसिक वाडी व गोरसेना या सामाजिक संघटनेच्यावतीने आरोग्य चळवळ उभी केली आहे.तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, चार प्राथमिक आरोग्य केंद्र अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र येथे वेळेत व व्यवस्थित औषधोपचार होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. तसेच लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी याकरिता जनजागृती होताना दिसत नाही. त्यामुळे केवळ माहिती नाही म्हणूनही अनेकदा नागरिक रोगाला निमंत्रण देतात. दूषित पाणी, वातावरण यामुळे साथीचे आजार पसरतात. प्रकृती बिघडली की मग शासकीय रुग्णालय गाठले जाते. परंतु तिथे व्यवस्थित औषधोपचार होत नाही. त्यामुळे लोकांना महागड्या खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो, असे चित्र आज प्रत्येक खेड्यापाड्यात पहायला मिळते.हे चित्र कुठेतरी बदलावे, रुग्णावर गावातच औषधापेचार व्हावा तसेच अनेक आजारांना जागरूकता ठेवून पायबंद घातला जावा यासाठी गोरसिकवाडी व गारसेना या सामाजिक संघटनांनी विडा उचलला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध होत नाही, लहान मुलांमध्ये असणारे कुपोषणाचे प्रमाण तसेच अनेक आजाराबद्दल असणारे समज-गैरसमज आदी बाबी या संघटनेच्या कार्यकर्त्याच्या निदर्शनास आल्यानंतर तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत तळेगाव, चिखली, साजेगाव, भांडेगाव, डोल्हारी देवी, घाटकिन्ही आदी गावात शिबिर पार पडली आहे.बालरोगतज्ज्ञ डॉ.मनोज राठोड, डॉ.अमर चावके, डॉ.किरण चव्हाण, रितेश गांधी, राजू बांते आदींनी यासाठी पुढाकार घेतला आहे. शिबिर यशस्वीतेसाठी गोरसिकवाडीचे जिल्हा संयोजक देवानंद चव्हाण, तालुका संयोजक मनोज चव्हाण, तालुका प्रमुख किशोर पालत्या, रवी जाधव आदींचे सहकार्य मिळत असल्याचे सांगण्यात आले.आरोग्य विषयात ग्रामीण भागात विदारक चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी आमच्याजवळ असलेल्या ज्ञानाचा वापर करीत आम्ही खारीचा वाटा उचलत आहो.- डॉ. मनोज राठोड,बालरोगतज्ज्ञ, दारव्हा
गोरसेनेची दारव्हा येथे आरोग्य चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 9:54 PM
ग्रामीण भागात शिबिर आयोजित करून सर्व लहानथोरांची आरोग्य तपासणी केल्यानंतर औषधोपचार करण्यासाठी तसेच आरोग्याविषयी जनजागृती व्हावी,...
ठळक मुद्देस्तुत्य उपक्रम : औषधोपचार, जनजागृतीत महत्त्वाचे योगदान