पुसद : महाराष्ट्र शासनाने गेल्या चार वर्षांपासून अर्थात २०१७-१८ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराची घोषणा केली नाही. त्यामुळे शासनाला पुरस्काराचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्य शासनाच्यावतीने गेल्या ३० ते ४० वर्षांपासून मागासवर्गीय संस्था व मागासवर्गीय समाजाकरिता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देण्यात येत होता. मात्र, गेल्या चार वर्षांपासून या पुरस्काराची घोषणाच झाली नाही. महाराष्ट्र शासनाने येत्या १४ एप्रिल अर्थात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराची घोषणा करावी व मागासवर्गीय समाजाला दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. येत्या १४ एप्रिल रोजी शासन पुरस्कार जाहीर करेल काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.