तालुक्यातील रेशनचे हजारो टन शासकीय धान्य तालुकास्थळी साठविण्यासाठी शहराच्या बाहेर सन १९६८ मध्ये शासकीय गोडाऊन बांधण्यात आले. आता या गोडाऊनला ५० वर्षापेक्षा जास्त कालखंड लोटला आहे. आता हे गोडाऊन शहराच्या मध्यवस्तीत आले असून सभोवताली घरे आहेत. गोडाऊनची इमारत जीर्ण होत आली आहे. गोडाऊनच्या सभोवताली नेहमी घाणीचे साम्राज्य, सांडपाणी साचलेले असते. तसेच साठवलेल्या धान्यातील किडे, सोंडे नागरिकांच्या घरात जात असल्याने आणि धान्य सडून दुर्गंधी सुटत असल्याने रोगराईला निमंत्रण मिळत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना घरात राहणे कठीण होत आहे. त्यामुळे हे शासकीय गोडाऊन या ठिकाणाहून बाहेर हलवावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे. ५० वर्षापूर्वी बांधलेल्या या गोडाऊनची इमारत आता जीर्ण होत आली आहे. वर्दळीच्या ठिकाणी व वस्तीत गोडाऊन असल्याने याचा वस्तीतील नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे हे गोडाऊन शहराच्या बाहेर हलवून महसूल प्रशासनाने ही जागा नगरपंचायतकडे हस्तांतरित करून याठिकाणी सांस्कृतिक भवन बांधावे, अशी मागणी स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.
सरकारी धान्य गोदाम घाणीच्या विळख्यात, नागरिकांना होतोय त्रास : गोदाम मध्यवस्तीतून हलविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:42 AM