विजय दर्डा : प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीची साधारण सभायवतमाळ : राज्यातील सर्वच सहकारी सूतगिरण्या आर्थिक अडचणीत असून त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने ठोस धोरण जाहीर करावे, असे प्रतिपादन येथील प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांनी केले. लोहारास्थित प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीची साधारण सभा शनिवारी पार पडली. अध्यक्षस्थानी विजय दर्डा होते. उपस्थित शेतकरी सभासदांपुढे आपले मनोगत व्यक्त करताना विजय दर्डा म्हणाले, सहकारी सूतगिरण्या अतिशय कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहेत. यातील अनेक गिरण्या केव्हाही बंद पडू शकतात. त्यांना वाचविण्यासाठी सरकारने खास धोरण तयार करून त्याची तातडीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सर्व सहकारी सूतगिरण्यांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक २५ आॅगस्टला मुंबईत पार पडली. त्यात गिरण्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला गेला. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या व हजारो हातांना रोजगार देणाऱ्या या तोट्यातील सूतगिरण्या आणखी पुढे चालविण्यास असमर्थता या बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यानंतर सूतगिरण्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १ सप्टेंबरला गिरण्या बंद ठेऊन लाक्षणिक संप पुकारला गेला. सरकारने वेळीच काहीतरी पाऊले सूतगिरण्या वाचविण्यासाठी उचलणे गरजेचे असल्याचे दर्डा यांनी सांगितले. प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीला २५ हजार २०० चात्यांकरिता ५२ कोटी ७४ लाखांच्या प्रकल्प मूल्यासह मान्यता देण्यात आली होती. मात्र या प्रकल्पावर ६४ कोटी ७२ लाख २३ हजार रुपये खर्च झाला. शासनाद्वारे नवीन प्रकल्पाकरिता तब्बल आठ वर्षांनंतर ३० जून २०११ ला फेरमूल्यांकन करण्यात आले. मात्र शासनाकडून प्रियदर्शिनीचे फेरमूल्यांकन न झाल्याने गिरणीला शासनाकडून मिळणाऱ्या भांडवलाचा लाभ प्राप्त झाला नाही. त्यामुळे आर्थिक संकट वाढले. हे फेरमूल्यांकन करण्यात यावे, याकरिता आपण स्वत: मुख्यमंत्री, अर्थमंत्री, वस्त्रोद्योगमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या सूत गिरणीचे फेरमूल्यांकन ६१ कोटी ७४ लाख करण्याबाबत मागणी केली. त्यांनी त्यासाठी संबंधित खात्याला निर्देश दिल्याचे विजय दर्डा यांनी सांगितले. ३१ मे रोजी सूत गिरणीला मोठी आग लागली. त्यात बरेच नुकसान झाले. मात्र जीवाची पर्वा न करता ही आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या सूत गिरणीतील कर्मचाऱ्यांचे विजय दर्डा यांनी कौतुक केले. दीपप्रज्वलन आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमा पूजनाने या सभेला सुरुवात झाली. प्रास्ताविक सूत गिरणीचे उपाध्यक्ष माजी आमदार कीर्ती गांधी यांनी केले. सूत गिरणीच्या प्रगतीचा आढावा त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून घेतला. सरकारकडून सूत गिरणीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजातील सबसीडी देण्यास होणारा विलंब आणि त्यासाठी केंद्रीय अर्थ, वस्त्रोद्योग मंत्रालयापर्यंत केला जाणारा पाठपुरावा याची माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर सूत गिरणीचे संचालक किशोर दर्डा, माणिकराव भोयर, सुधाकर बेलोरकर, प्रकाशचंद छाजेड, संजय पांडे, बाळासाहेब मांगुळकर, जयानंद खडसे, कैलास सुलभेवार, डॉ. प्रताप तारक, लीलाबाई बोथरा, उज्ज्वला अटल, डॉ. जाफर अली जिवाणी, महाव्यवस्थापक डॉ. सी. जेय रघुरामन आदी उपस्थित होते. सभेचे संचालन माणिकराव भोयर यांनी केले. यावेळी दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (प्रतिनिधी)
सहकारी सूत गिरण्यांसाठी सरकारचे ठोस धोरण असावे
By admin | Published: September 20, 2015 12:11 AM