यवतमाळ : विदर्भात १२८ तर मराठवाड्यात १०२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे सरकारच्या चार हजार कोटींच्या मदतीचे दावे केवळ कागदावर दिसत असल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्याचा दिलासा दौरा केला. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाशी त्यांनी वार्तालाप केला. मात्र यानंतर १० शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. यावरून शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. राज्यातील दुष्काळग्रस्तांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. पीककर्ज डोक्यावर आहे. रोजगार नसल्याने त्यांची दैनावस्था झाली आहे. अंत्योदय अन्न सुविधा, आरोग्य-रोजगार सुरक्षा, पीककर्ज माफी या शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी तिवारी यांनी केली आहे. यंदा निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्या तत्काळ मदतीची गरज असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)
सरकारचा मदतीचा दावा कागदावरच
By admin | Published: March 11, 2015 1:51 AM