यवतमाळ : गोरगरीब कॅन्सर रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचाराची सोय असली तरी केमोथेरपीसाठी अनेक रुग्णांकडे पैसे मागितले जात आहेत. या जाचामुळे यवतमाळातील दोन गरीब रुग्ण चक्क नागपूरच्या रुग्णालयातून घरी परत आले असून, ते मृत्यूशी झुंज देत आहेत.
कॅन्सरच्या उपचारासाठी शासकीय योजनेतून केमोथेरपीसाठीही निधी मंजूर केला जातो. मात्र, ज्या गरीब रुग्णांना केमोथेरपी इंजेक्शनची गरज आहे, त्यांना स्वखर्चाने केमो आणण्यासाठी सांगितले जात आहे. यवतमाळच्या दोन रुग्णांवर नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ही परिस्थिती ओढवली.
सोनू देवीदास अतकारी (२९, रा. हिवरी) आणि सविता महादेव पवार (३८, रा. वंजारी फैल) या दोन कॅन्सर रुग्णांवर नागपूरच्या रुग्णालयात शासकीय योजनेमधून उपचार सुरू होते. त्यांना आता केमोथेरपी इंजेक्शनची आवश्यकता आहेे. मात्र, हॉस्पिटलच्या वतीने त्यांना एक लाख रुपयांचे केमो इंजेक्शन स्वखर्चाने आणण्यास सांगण्यात आले. हे दोन्ही रुग्ण अत्यंत गरीब असून, एक लाखांची व्यवस्था नसल्यामुळे मधेच उपचार सोडून त्यांना घरी परत यावे लागले.
खर्च किती येणार, हे सांगण्यासही नकार
हे दोन्ही रुग्ण केमोचा खर्च करू शकत नसल्याने घरी परतले. आता त्यांना मुख्यमंत्री सहायता निधी किंवा अन्य एखाद्या योजनेतून निधी मिळवून देण्यासाठी येथील ज्योती कॅन्सर रिलीफ सेंटरच्या वतीने प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, त्यासाठी हॉस्पिटलकडून खर्चाचे अंदाजपत्रक (इस्टीमेट) आवश्यक आहे. असे अंदाजपत्रक देण्यासही संबंधित रुग्णालय प्रशासन नकार देत असल्याची खंत सेंटरचे संचालक सतीश मुस्कंदे यांनी व्यक्त केली. गंभीर कॅन्सर रुग्णांना केमोथेरपी इंजेक्शनसाठी शासकीय योजनेत तरतूद करावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.