फोटो
अविनाश खंदारे
उमरखेड : येथील राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय रुग्णालयात २०१० पासून शवविच्छेदकच नाही. त्यामुळे गेल्या ११ वर्षांपासून अपघात, सर्पदंश, घातपात आदींमुळे मृत्यू झालेल्या, तसेच आत्महत्या केलेल्या मृतदेहांचे शवविच्छेदन खासगी व्यक्तीकडून करून घेतले जात आहे. मात्र, त्यासाठी मृतांच्या नातेवाइकांना नाहक अवाजवी पैसे मोजावे लागतात. परिणामी, मृतांच्या नातेवाइकांना दुःखातही नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
तालुक्यात मुळावा, विडूळ, ढाणकी, कोरटा, थेरडी व सोनदाबी, अशी सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्याअंतर्गत उपकेंद्रातील सुमारे ११० गावे येतात. कोणत्याही गावात अपघात, सर्पदंश, आत्महत्या, खून झाला तर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी येथील शासकीय रुग्णालयात आणले जाते. शहराची लोकसंख्या ६० हजारांवर आहे. शहरातही अनेकदा अपघात होतात. आत्महत्या किंवा सर्पदंशाच्या घटना घडतात. त्या घटनेतील मृतदेह रुग्णालयात आणले जातात. मात्र, २०१० पासून रुग्णालयात शवविच्छेदन करणाऱ्या स्विपरची जागा रिक्त आहे.
शासकीय रुग्णालयात शवविच्छेदक नसल्याने आतापर्यंत शेकडो मृतदेहांचे शवविच्छेदन खासगी व्यक्तीकडून करवून घेतले गेले. मृतांचे नातेवाईक अगोदरच दुःखात असतात. त्यांच्या परिवारावर दुःख कोसळल्याने त्यांची मन:स्थिती चांगली नसते. त्यात शवविच्छेदनासाठी खासगी व्यक्तीची शोधाशोध करावी लागते. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
बॉक्स
दुःखात दीड ते दोन हजारांचा भुर्दंड
मृतांचे नातेवाईक दुःखातही उत्तरीय तपासणकरिता खासगी व्यक्तीचा शोध घेतात. तो सापडला तर त्याला दीड ते दोन हजार रुपये द्यावे लागतात. सांगितले तेवढे पैसे दिले तर ठीक; अन्यथा ती व्यक्ती निघून जाते. त्यामुळे अनेकदा मृतांच्या नातेवाइकांना ताटकळत बसावे लागते. परिणामी, पोलीस व रुग्णालय प्रशासनाला मृतांच्या नातेवाइकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. या गंभीर प्रकाराकडे सर्व लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
कोट
शासकीय रुग्णालयात २०१० पासून शविच्छेदन करणारा स्विपर नाही. जागा रिक्त आहे. ती तात्काळ भरण्यासाठी अनेकदा वरिष्ठांकडे पाठपुरावा केला. शवविच्छेदनासाठी खासगी व्यक्तीला दोन हजार रुपये रुग्णालयाकडून दिले जातात.
-डॉ. रमेश मांडण,
वैद्यकीय अधिकारी, शासकीय रुग्णालय, उमरखेड