दत्तात्रय देशमुख
उमरखेड (यवतमाळ): विदर्भासह मराठवाड्याचा सीमावर्ती परिसर शेतकऱ्यांच्या काबाडकष्टातून उभा राहिला आहे. हे सरकार सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकऱ्यांचे आहे. त्यामुळे विदर्भ-मराठवाड्याच्या मागास भागातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी दिली. दीड वर्षापूर्वी आम्ही धाडस केले, त्यामुळेच आज राज्याच्या विकासाला गती मिळाल्याचेही ते म्हणाले.
उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे वसंत साखर कारखाना साखर पूजन व शेतकरी मेळाव्यात बुधवारी दुपारी ते बोलत होते. या भागातील शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आठ वर्षांपासून रखडलेल्या पैनगंगा प्रकल्पाला गती दिली आहे. पैनगंगा नदी पात्रातील मंजुरी मिळालेल्या कोल्हापुरी बंधारे निर्मिती कामाची निविदा लवकरच काढण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, आम्ही शेतकऱ्यांचीच मुले आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची आम्हाला जाणीव आहे. दीड वर्षाच्या कालावधीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत शेतकऱ्यांना ४४ हजार कोटींची मदत केली. विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा डाग पुसून काढण्यासाठी एकीकडे टास्क फोर्स कार्यरत आहेत. तर दुसरीकडे या भागातील शेतकऱ्यांना प्रगतशील बनविण्यासाठी विविध प्रोत्साहनपर योजना राबविण्याचा प्रयत्न आहे. वसंत साखर कारखान्याचे २६ हजार शेतकरी सभासद असून या कारखान्यावर सुमारे लाखभर लोकांची रोजीरोटी अवलंबून आहे. हा कारखाना व्यवस्थित चालावा यासाठी खासदार हेमंत पाटील स्वत: प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. राज्यात कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशी संकटे उभी ठाकत असतानाही जाचक अटी बाजूला सारून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही पुढाकार घेतला. एक रुपया पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १ कोटी ७० लाख इतकी असून शेतकरी पीकविमा अग्रिम रक्कम देणारे हे देशात पहिले सरकार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मेळाव्याला पालकमंत्री संजय राठोड, खासदार हेमंत पाटील, खासदार भावना गवळी, आमदार नामदेव ससाणे, राजश्री पाटील, तानाजी मुटकुळे, आमदार भीमराव केराम, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, विजयराव खडसे, राजेंद्र नजरधने, रामराव वडकुते, गजानन घुगे, तातु देशमुख, चितंगराव कदम, नितीन भुतडा, उमाकांत पापिनवार, नितीन माहेश्वरी , शाम भारती, अजय देशमुख, प्रीतेश पाटील आदी उपस्थित होते.
आंध्रप्रदेशात वाहून जाणारे पाणी थांबेल
विदर्भ-मराठवाडा येथील पैनगंगा नदीच्या पात्रात ६ कोल्हापुरी बंधाऱ्यांना मंजुरी मिळविली आहे. यामुळे नदीचे आंध्रप्रदेशात वाहून जाणारे पाणी थांबेल. पर्यायाने या भागातील ७५ हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होईल. त्यामुळे येणाऱ्या काळात वसंतच्या २६ हजार ऊस उत्पादक सभासदांना वाढीव उत्पन्नाची संधी मिळेल. शिवाय एक हजार कामगारांच्या हातांना कामही मिळेल, असे खासदार हेमंत पाटील म्हणाले. आमदार नामदेव ससाने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कृत्रिम अंग वाटपाचे उद्घाटन करण्यात आले.