नेर (यवतमाळ) : आरक्षण असो अथवा इतर मुद्दे विविध जाती समूहांना एकमेकांसमोर उभे करून राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडूनच सुरू आहे. नागरिकांनी या मागचे कारस्थान ओळखून सरकारला विकासाच्या मुद्यावर प्रश्न विचारावेत, असे आवाहन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.
नेर येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर रविवारी रात्री आयोजित महाप्रबोधन यात्रेत अंधारे बोलत होत्या. यावेळी मंचावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज, माजी क्रीडा मंत्री संजय देशमुख यांच्यासह बाबू पाटील जैत, संतोष ढवळे, कॅप्टन प्रशांत सुर्वे, रविपाल गंधे, सेवानिवृत्त न्यायाधीश किशोर राठोड आदींची उपस्थिती होती. माझ्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस वाट बघत आहेत. मात्र, मला कशाची भीती नसल्याचे सांगत यवतमाळ जिल्ह्यातील अनेक प्रश्न ‘जैसे थे’ आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यात हे सरकार अपयशी ठरल्याचा घणाघात अंधारे यांनी केला. शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्याच पैशातून सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत असल्याचे त्या म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अंधारे यांनी जोरदार टीका केली. भाजपने दोन पक्ष फोडले. मात्र, त्यानंतरही त्यांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावे लागल्याचे त्या म्हणाल्या. पोहरादेवीसारख्या पवित्र ठिकाणीही सरकारकडून राजकारण खेळले जात आहे. तेथे तोंड बघून निधीचे वितरण केले जात असून महंत सुनील महाराजांच्या परिसरात निधी दिला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. आता जाती-धर्माच्या नावावर ते मते मागायला येतील. मात्र, यामध्ये गुरफुटून न जाता तुम्ही पोटा-पाण्याच्या प्रश्नाबाबत जाब विचारा. अदानी, अंबानींच्या मुलांना ज्या दर्जाचे शिक्षण मिळते ते शिक्षण कष्टकऱ्यांच्या मुलांना कधी मिळणार, असा सवाल करीत या सरकारच्या काळात महाराष्ट्राची सर्वस्तरात पीछेहाट झाल्याचे त्या म्हणाल्या.
प्रारंभी संजय देशमुख यांनी प्रास्ताविक केले. कापसाचे दर पडले आहे, तीच परिस्थिती सोयाबीनची आहे. दुसरीकडे महागाई वाढली असून हा संताप नागरिकांनी येत्या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करावा, असे आवाहन त्यांनी केले.