विजय दर्डा : प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीची आमसभा यवतमाळ : शासन नवीन उद्योगासाठी पायघड्या घालत आहे. त्यांच्यावर विविध सवलतींची खैरात करीत आहे. मात्र राज्यातील आजारी आणि जुन्या उद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी कोणतेच प्रयत्न करीत नाही. शासनाच्या धोरणात जुने उद्योग बेदखल झाले आहे, असे प्रतिपादन येथील प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी सोमवारी येथे केले. प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सूत गिरणीच्या सभागृहात सोमवारी पार पडली. त्यावेळी ते उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करीत होते. विजय दर्डा म्हणाले, विजेचे दर, बाजारपेठेतील उतार-चढाव आणि कापसाचे भाव यामुळे सूत गिरणी अडचणीत आली आहे. सूत गिरणीला या अडचणीत शासनाने मदत करावी यासाठी मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वस्रोद्योग सचिव यांची संयुक्त बैठक झाली. जुन्या उद्योगाबाबत शासनाने भूमिका घ्यावी, असेही सांगण्यात आले. या बैठकीत शासनाकडून लवकरच अडचणीत असलेल्या उद्योगांसाठी ठोस उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यावर नेमक्या कधी उपाययोजना होणार याची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीचे सर्व सभासद सूत गिरणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळेच ही सूत गिरणी विविध अडथळे पार करीत सुरू असल्याचे दर्डा यांनी सांगितले. सभेच्या सुरुवातीला स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा सूत गिरणीचे संस्थापक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन सूत गिरणीचे सभासद जिजाबाई झोले (परसोडी, कळंब), सूर्यभान चौधरी (बेलोरा, घाटंजी), धर्माजी शेंडे (खुदावंतपूर, कळंब) यांनी केले. या सभेला सूत गिरणीचे उपाध्यक्ष माजी आमदार कीर्ती गांधी, संचालक किशोर दर्डा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, माणिकराव भोयर, डॉ. अनिल पालतेवार, सुधाकर बेलोरकर, प्रकाशचंद छाजेड, संतोषकुमार भूत, संजय पांडे, कैलास सुलभेवार, जयानंद खडसे, डॉ. प्रताप तारक, लीलाबाई बोथरा, सूत गिरणीचे व्यवस्थापक सतीश सबळ तसेच उद्योजक महेश अग्रवाल आदी उपस्थित होते. वार्षिक अहवाल वाचन माणिकराव भोयर यांनी केले. त्यानंतर सूत गिरणीच्या एकंदर वाटचालीचा लेखाजोखा कीर्ती गांधी यांनी मांडला. सुरुवातीला सूत गिरणीच्या दिवंगत सदस्य स्वातंत्र्य संग्राम सैनिक बाबाराव राऊत, जगदीश प्रसाद शर्मा, बी.जी.यादव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच जम्मू काश्मीर येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेला सूत गिरणीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन माणिकराव भोयर यांनी केले. (कार्यालय प्रतिनिधी) विजयबाबूंच्या नेतृत्वावर मंत्रीद्वयांचा विश्वास ४साडेसहा हजार सभासद संख्या असलेल्या सूत गिरणीचे अध्यक्ष म्हणून माजी खासदार विजय दर्डा यांची अविरोध निवड करण्यात आली. केवळ शिवसेनेच्या दोन आणि भाजपाकडून एका कार्यकर्त्याने उमेदवारी दाखल केली होती. मात्र पालकमंत्री संजय राठोड आणि राज्यमंत्री मदन येरावार यांनी स्वत:हूनच आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मागे घेण्याचे निर्देश दिले. विजयबाबूंच्या नेतृत्वातच सूत गिरणीची उत्तरोत्तर प्रगती होईल, असा विश्वास मंत्रीद्वयांनी दाखविला, असे सूत गिरणीचे उपाध्यक्ष कीर्ती गांधी यांनी सांगितले.
शासनाच्या धोरणात जुने उद्योग बेदखल
By admin | Published: September 20, 2016 2:05 AM